Download App

लातूरमध्ये चार मजली इमारतील भीषण आग, तिघांचा मृत्यू, परिसरात खळबळ

  • Written By: Last Updated:

लातूर : लातूरमध्ये (Latur Fire) आज सकाळी साडेआठच्या सुमारास एका इमारतीला अचानक भीषण आग लागली. या आगीत तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या (fire brigade) अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आले. मात्र, यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

‘PM मोदी आता ग्रामपंचायतीचे सरपंच झालेत’; प्रकाश आंबेडकरांचं मोदींच्या दौऱ्यावर बोट 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी लोंढे यांची लातूर शहरातील छत्रपती शिवाजी चौकाजवळ शिवाई नावाची व्यावसायिक आणि निवासी इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर देशमुख यांचे फुलांचे आणि मंडप सजावटीचे दुकान आहे. या दुकानात सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

काही क्षणातच या आगीने उग्र रूप धारण केले आणि पाहता पाहता ही आग दोन्ही मजल्यावर पोहोचली. इमारतीतून आगीच्या ज्वाळा आणि धूर निघू लागला. आगीचा भडका अधिक असल्यानं त्यावर नियंत्रण मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. यावेळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या शिवाजी लोंढे यांच्या कुटुंबाला आगीने विखळा घेतला. या आगीत पत्नी कुसुमबाई शिवाजी लोंढे (वय 80 वर्षे), मुलगा सुनील शिवाजी लोंढे (वय 58 वर्षे) आणि सून प्रेमिला सुनील लोंढे (वय 50 वर्षे) यांचा होरपळून मृत्यू झाला.

तर त्याच इमारतीत राहणारी बीडची रहिवासी कु. अजरा अजिज सय्यद वय 22 तिची आई जिनत फातेमा, भाऊ फहाद यांना आगीचे चटके बसल्यानं ते जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, वैद्यकीय पथक आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधीक्षक भागवत फुंडे, छत्रपती शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप सागर हे घटनास्थळी हजर झाले.

अग्निशमन दलाचे जवान बळीराम कांबळे, चंदू जाधव, आनंद शिंदे, ज्ञानेश्वर मगर, चंद्रकांत कोमडे, राधाकिशन कासले, मोसीन शेख, सोहेल शेख, सतीश खताळ, प्रीतम कांबळे, बसवराज स्वामी यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत लोंढे कुटुंबियांवर काळाने झडप घातली होती.

ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवल्या जातोय. दरम्यान, या आगीत मोठं आर्थिक नुकसात देखील झालं आहे. या घटनेने लातूर शहरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags

follow us