Download App

धनंजय मुंडेंची सुप्त इच्छ पूर्ण; पवारांचं विधान म्हणजे देवाने दिलेला आशीर्वाद

Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार आजही आमच्याच पक्षाचे नेते आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट पडली असे म्हणता येणार नाही, असे पवार आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पीक पाणी व पावसाच्या एकूण परिस्थितीचा आढावा बैठक होणार आहे. त्यानिमित्त आज मंत्री मुंडे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी  प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांनी आज सकाळी अजित पवार गटाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारला.

‘काही लोकांची पावलं NDA च्या दिशेने?’ पवारांच्या वक्तव्यानंतर मंत्री सामंतांना वेगळाच संशय

मुंडे म्हणाले, शरद पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे आम्हाला आमच्या देवाचा मिळालेला आशीर्वादच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही घेतलेल्या भूमिकेला जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे. हे आम्ही आधी देखील म्हणालो होतो. त्यानुसार लोकशाही मार्गानेच आम्ही ही भूमिका स्वीकारली आहे. आता शरद पवार यांनीही आम्हाला पाठिंबा दिला असे वाटते. या माध्यमातून आम्हाला आमच्या देवाचाच आशीर्वाद भेटला.

हा तर देवानेच आम्हाला आशीर्वाद दिला आहे. शरद पवारांच्या वक्तव्याचा हाच अर्थ आहे. चांगलं काम करणाऱ्या माणसाला पाठिबा द्या अशी विनंती आम्ही पवार साहेबांना आम्ही आधीपासूनच करत होतो, असे वक्तव्य मंत्री मुंडे यांनी केले.  मुंडेंच्या या वक्तव्यानंतर अजित पवार गटाला शरद पवार यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा तर नाही ना अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

‘त्रिशूळ’ सरकारला जनता देणार ‘दे धक्का’; लोकसभेसाठी जनता ‘मविआ’च्या फेव्हरमध्ये

शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेतल्यानंतर अजित पवार गटाकडून बीड येथे उत्तरसभा घेतली जाणार आहे. या दरम्यान बीडमध्ये उत्तर देण्याची नाही तर उत्तरदायित्वाची सभा घेतली जाणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले. बीड जिल्ह्याप्रती असलेल्या आमच्या उत्तरदायित्वाच ही सभा असेल असे मुंडे म्हणाले.

कांदा खरेदीसाठी नाफेडची कोणतीच नवी अट नाही

नाफेडच्या खरेदीत काहीच अटी नाहीत. केंद्र सरकारच्या दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीच्या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी कांदा खरेदी सुरू झाली आहे. हा निर्णय केंद्राचा आहे. तरी काही ठिकाणच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या नाफेड आणि एनएफसीसी या संस्थांनी बाजारात येऊन खरेदी करावी. शेतकऱ्यांच्या या निर्णयावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. नाफेडने कोणत्याही अटी नव्याने टाकलेल्या नाहीत त्या आधीच्याच आहेत. वेगळी अट काहीच घेतली गेलेली नाही, असे मुंडे म्हणाले.

Tags

follow us