‘काही लोकांची पावलं NDA च्या दिशेने?’ पवारांच्या वक्तव्यानंतर मंत्री सामंतांना वेगळाच संशय
Ajit Pawar Latest Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार आजही आमच्याच पक्षाचे नेते आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट पडली असे म्हणता येणार नाही, असे पवार आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाचे नेतेही प्रतिक्रिया देत आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मात्र या वक्तव्यावरून वेगळेच राजकारण सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
वडेट्टीवारांना पवारांवर पूर्ण विश्वास; विधानाचा अर्थ अजितदादा अन् फडणवीसांना विचारा
सामंत (Uday Samant) यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवारांच्या वक्तव्याबाबत विचारले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या वक्तव्याबाबत संभ्रमात राहण्याची काहीच गरज नाही. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच स्पष्ट केलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात झालेला विकास, जागतिक पातळीवर देशाला मिळत असलेलं प्राधान्य या कार्यपद्धतीने प्रेरित होऊन तसचे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारमध्ये मी तिसरं इंजिन घेऊन येतोय हे सांगितलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याबाबतीत अजितदादांकडून कोणताच संभ्रम नाही.
‘इंडिया’ आघाडीलाच हा खरा संभ्रम आम्हाला नाही
आता तर पिंपरी चिंचवड किंवा पुण्यात ज्या पद्धतीने अजितदादांचं स्वागत होत आहे ते न भूतो न भविष्यती असेच आहे. त्यावर जर अजितदादा हे आमचे नेते आहेत अशी प्रतिक्रिया असेल तर काही लोकांचं पाऊल एनडीएकडे पडतंय की काय? अशी शंका आता निर्माण होत आहे. अजितदादांनी आधीच स्पष्ट केलं असताना जर अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत असे जर वक्तव्य येत असेल तर माझं वैयक्तिक मत असं आहे की काही लोकांचं पाऊल एनडीएकडे पडत आहे. म्हणून इंडियातील नेते किती नेते एकजूट राहतात हे पाहणं महत्वाचे असून हा जो संभ्रम दिसत आहे हा त्यांच्यासाठी आहे आमच्यासाठी नाही.
मी सुद्धा राष्ट्रवादीत कार्यकर्ता आणि आमदार होतो -सामंत
एनडीएकडे काही लोकांची पावले पडत आहेत ते लोक कोण? असा प्रश्न विचारला असता सामंत म्हणाले, दुसऱ्या पक्षावर बोलण्याचा अधिकार मला नाही. मी सुद्धा काही काळ राष्ट्रवादीत होतो. तेथे कार्यकर्ता आणि आमदार म्हणून काम केलंय. पक्ष सोडला म्हणून नेत्यांवर तोंडसुख घेणारा मी नाही. परंतु, एकूणच राष्ट्रवादीतील फूट म्हणण्यापेक्षा अजितदादा हे आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे याला फूट म्हणावी की आणखी काही हे मला माहिती नाही पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत नाही तर महायुतीत आहे हे अजित पवार यांनीच सांगितलं आहे.