Manoj Jarange : राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण (Maratha Reservation) मंजूर करण्यात आलं. परंतु, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मात्र सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. या घडामोडीतच काल अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांनी पत्रकार परिषद घेत जरांगेंवर अनेक गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपांवर आज मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे. बारस्कर यांचा उल्लेख भोंदूबाबा करत तो बावळट माणूस आहे, असा हल्लाबोल जरांगे यांनी केला. त्यासोबतच जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल तोंडातून शब्द गेले असतील ते माझ्या नाराजीतून चिडचिडीतून गेले असतील. तुकाराम महाराजांबद्दल आपली सपशेल माघार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पुढे म्हणाले, आमच्या आंदोलनात बारस्करसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक प्रवक्ता आह. यांचा ट्रॅप खूप दिवसांआधीच आम्हाला कळला आहे. तुकाराम महाराजांविषयी माझ्या तोंडून शब्द निघून गेला त्याला पकडून आता हे लोक डाव साधायला लागले आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराजांविषयी माझ्या तोंडून शब्द गेले असतील ते माझ्या नाराजीतून आणि चिडचिडीतून गेले असतील. पण, तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन आयुष्यातील पहिली माफी मागतो असे जरांगे पाटील म्हणाले.
अजय बारस्करला शिंदे-फडणवीसांच्या नेत्यांची फूस
यानंतर त्यांना अजय महाराज बारस्कर यांच्यावर घणाघाती टीका केली. अजय बारस्कर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही एक नेता आहे. अजय बारस्करला शिंदे आणि फडणवीसांच्या नेत्यांची फूस आहे, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला. अजय बारस्कर एका प्रकरणात अडकले होते. हे प्रकरण सरकारकडून दाबले गेले. तू जरांगेंविरुद्ध बोल नाहीतर तुझं प्रकरण उघड करू अशी धमकी त्यांना देण्यात आली होती, असा दावा जरांगे यांनी केला. अजय बारस्कर यांना विकत घेतले गेले आहे. अजय बारस्कर बच्चू कडू यांच्यासोबत यायचे. ज्या माणसाला सोशल मीडियावर काडीचीही किंमत नाही त्याच्यासोबत चॅनल्स आता तासनतास बोलत आहेत. सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय या गोष्टी शक्य आहेत का?, असा सवाल जरांगे यांनी विचारला.
अजय महाराज बारस्करांची प्रहारमधून हकालपट्टी, जरांगेंवर टीका केल्यानं बच्चू कडूंचा मोठा निर्णय
अजय बारस्कर यांनी अनेक भानगडी केल्या आहेत. भिशीचे पैसे घेऊन तो दुसऱ्या गावात पळून गेला होता. एका संस्थानाच्या नावाखाली लोकांकडून 300 कोटी रुपये जमा केले होते. आता माझ्यावर टीका करण्यासाठी सरकारकडून त्याने 40 लाख रुपये घेतले आहेत, अशा एकेरी शब्दात जरांगे पाटील यांनी अजय बारस्कर यांच्यावर गंभीर आरोप केले.