Download App

Video : “मंत्रिपदाची इच्छा होतीच पण मिळालं नाही याची खंत”, सोळंकेंनी मनातलं सांगितलंच..

माझी मंत्रि‍पदाची इच्छा होतीच. परंतु, पक्षाने निर्णय घेतला मला संधी मिळू शकली नाही. याची मनात खंत निश्चितच आहे.

MLA Prakash Solanke on Minister Post : राज्य मंत्रमंंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना डावलण्यात आलं. त्यांना यंदा मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. खुद्द सोळंके देखील मंत्रिपदासाठी प्रचंड आशावादी होते. परंतु, मंत्रिपदाने हुलकावणी दिलीच. यानंतर अजितदादांची भेट घेत त्यांनी नाराजी स्पष्ट बोलूनही दाखवली पण त्याचा उपयोग झाला नाही. आता राजकारण बरचसं पुढं गेलं आहे. शपथ घेतलेल्या मंत्र्यांना लवकरच खातीही मिळतील पण मंत्रिपदात डावलल्याची खंत सोळंकेंच्या मनात आजही ताजी आहे. लेट्सअप मराठीशी बोलताना त्यांच्या मनातली ही खंत ओठांवर आली. “मंत्रिपदाची इच्छा होतीच. परंतु, पक्षाने निर्णय घेतला मला संधी मिळू शकली नाही. याची मनात खंत निश्चितच आहे.” असे उद्गार प्रकाश सोळंके यांनी काढले.

राजकीय निवृत्तीची घोषणा प्रकाश सोळंकेंची अन् चर्चा सुरू झाली शरद पवारांची; काय आहे कनेक्शन?

यंदा तुमच्या मंत्रि‍पदाची चर्चा होती. परंतु, मिळालं नाही. तुम्ही नाराज आहात का किंवा तुमची इच्छाच नव्हती, असे विचारले असता सोळंके म्हणाले, माझी मंत्रि‍पदाची इच्छा होतीच. परंतु, पक्षाने निर्णय घेतला मला संधी मिळू शकली नाही. याची मनात खंत निश्चितच आहे. पण पक्षाने एकदा निर्णय घेतल्यानंतर तो मान्य करून पुढं जायला हवं असं माझं मत आहे. याबाबत अजितदादांकडेही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना वेळोवेळी भेटलो देखील आहे. परंतु, आता त्यांनी निर्णय घेतला म्हटल्यानंतर त्यावर आणखी काय बोलणार, असा सवाल सोळंकेंनी उपस्थित केला.

बीडचा पालकमंत्री कोण होणार?

तुमच्या जिल्ह्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या रुपाने दोन कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत. आता तुम्हाला काय वाटतं पालकमंत्री कोण व्हावं, असा प्रश्न विचारला असता, पालकमंत्री कुणाला करायचं हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. वरिष्ठ पातळीवर ते काय तो निर्णय घेतील. पण तुमची इच्छा काय, असे विचारले तर आता कुणीही झाला तरी आम्हाला काय फरक पडतोय. पंकजाताई, धनंजय मुंडे किंवा आणखी तिसरा कुणी जरी पालकमंत्री झाला तर काय फरक पडतोय. आणखी तिसरा कुणी येऊ शकतो का यावर सोळंके म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकतं. वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल.

बीडच्या प्रकरणावर ज्यावेळी सभागृहात चर्चा झाली त्यावेळी तुम्ही सभागृहात नव्हता. या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलं यावर तुम्ही समाधानी आहात का, या प्रश्नाचं उत्तर देताना सोळंके म्हणाले, हो मी पूर्ण समाधानी आहे. विविध पक्षांच्या आमदारांनी ज्या मागण्या या चर्चेदरम्यान केल्या होत्या. या प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी होती. स्थानिक पोलिसांनी तपास केला असता तर तो योग्य झाला नसता म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करून तपास करावा अशी मागणी होती. त्याप्रमाणे मु्ख्यमंत्र्यांनी घोषणा केली. न्यायालयीन चौकशीची देखील मागणी मान्य केली. मोका लावण्याची मागणी कुणीही केलेली नसताना हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून जाहीर केल्याचे सोळंके म्हणाले.

Video : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जातंय. धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत म्हणून मुंडेंनीही राजीनामा द्यावा असा विरोधकांचा सूर आहे. यावर तुमची भूमिका काय असे विचारले असता सोळंके म्हणाले, यावर मी काही भाष्य करणं योग्य नाही. या प्रकरणाचा तपास होणार आहे त्यामुळे तपासाआधी काही बोलून काय उपयोग. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जातील. धनंजय मुंडेंनी या प्रकरणी काही प्रतिक्रिया दिली असली तरी त्यांच्या प्रतिक्रियेवर काही अवलंबून नाही. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिलंय त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. त्यामुळे धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात त्यावर हा तपास अवलंबून आहे असं मला वाटत नाही.

follow us