Video : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Devendra Fadnavis on Beed Crime : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील प्रकरण अतिशय गंभीर आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपर्यंतच हे प्रकरण मर्यादीत नाही. या प्रकरणाची पाळंमुळं शोधून काढावी लागतील आणि बीड जिल्ह्यातील कायद्याची खालावलेली परिस्थिती दिसत आहे त्यात सुधारणा करावी लागणार आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सभागृहात केली. हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी सविस्तर निवेदन दिले.
फडणवीस पुढे म्हणाले, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत केली जाणार आहे. हत्या प्रकरणात बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्यास त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल. घडलेल्या प्रकरणात जो कुणी मास्टरमाइंड असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल कुणीही मास्टरमाइंड असो त्याच्यावर कारवाई होईल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला दिले.
Video : परभणी हिंसाचारातील आरोपी मनोरुग्ण; फडणवीसांनी विधानसभेत दिली A टू Z माहिती
बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत खालावली आहे यामध्ये सुधारणा करावी लागणार आहे. बीड जिल्ह्यातील गुन्हे करणाऱ्यांची पाळमुळं नष्ट करणार आहोत. आरोपींवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करणार असून गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
सरपंचाचे भाऊ विष्णू चाटे नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होते. चाटे हा त्यांना आता सोडू असं सांगत होता मात्र ते सोडत नव्हते. कंपनीने दिलेल्या फिर्यादीत वाल्मिक कराड नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचं नमूद करण्यात आलं आहे. कराडकडून दोन कोटी रुपये मागण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर कारवाई करण्यात येईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.
नेमकं काय घडलं, फडणवीसांनी सगळंच सांगितलं
संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण अतिशय गंभीर आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपर्यंतच हे प्रकरण मर्यादीत नाही. त्यामुळे या हत्येमागची पाळेमुळे शोधून काढली पाहिजेत. कंपनीचं काम मिळवण्यासाठी खंडणी मागितली जात आहे. एका ऊर्जा क्षेत्रातील कंपनीनं बीडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. काही जणांकडून कामं आम्हालाच द्या नाहीतर खंडणीची मागणी होत आहे. याच गुन्ह्यात ६ डिसेंबर रोजी कंपनीचं कार्यालय जिथे आहे तिथे काही जण गेले. त्यांनी तेथे वॉचमनला मारहाण आणि शिवीगाळ केली.
सीनियर प्रोजेक्ट मॅनेजरलाही मारहाण करण्यात आली. मारहाण झाल्यामुळे पीडितांनी सरपंचांना कॉल केला. बाजूच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्याने सरपंच तेथे तातडीने दाखल झाले. ९ डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात असताना टोलनाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली. गाडीच्या काचा फोडून हल्लेखोरांनी त्यांना बाहेर काढलं. स्कॉर्पिओ गाडीत टाकून त्यांना मारहाण केली. तारांनी गुंडाळून मारहाण केली. वाहनातून उतरवून पुन्हा मारहाण केली. या मारहाणीत संतोष देशमुख मरण पावल्याचे लक्षात येताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.