Maharashtra Weather Update : राज्यात एप्रिल महिन्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) मारा होत आहे. होळीनंतर उष्णतेत वाढ होण्याची शक्यता सांगितली होती. त्यानंतर उष्णतेत वाढ (Maharashtra Rain) झाली असली तरी सोबत अवकाळी पावसाचं संकटही आलं आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. आजही राज्यात काही जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील. विदर्भात काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अंदाज आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतही तापमानात वाढ होईल. या सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भावर अवकाळीचे ढग, मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात उन्हाचा कडाका; हवामानाचा अंदाज काय?
राज्यातील जनता सध्या हवामानातील चढ उताराचा अनुभव घेत आहे. मार्च महिन्यात रणरणतं ऊन होतं. पण शेवटच्या आठवड्यात हवामानात मोठा बदल झाला. सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला पण शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला होता. हा अंदाजही खरा ठरला. या महिन्यात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे.
विदर्भातील अकोला सर्वाधिक उष्ण ठरले आहे. येथे तापमान 44 अंशांच्या पुढे गेले आहे. अवकाळी पावसाचा प्रभाव कमी होऊन उष्णतेत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे या ठिकाणी उष्णतेच्या लाटेसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे या भागातही उन्हाचा कडाका जाणवणार आहे. विदर्भात पुढील दोन ते तीन दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांत तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे. मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्यात उष्णतेत वाढ होईल असेही हवामान विभागाने सांगितले होते. त्यानुसार या महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे. काही भागात तर तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले आहे.
आधी होम लोन क्लिअर कराल की SIP गुंतवणूक करताल? फायदा कशात, जाणून घ्या, सोपं गणित..