Download App

‘तो’ व्हिडिओ खरा असेल तर हे खूप महागात पडेल; मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil on eknath shinde : गेल्या 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषण करत आहेत. मंगळवारी (12 सप्टेंबर) मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत आहेत. आपण बोलून मोकळे व्हायचं, असं या व्हिडिओत मुख्यमंत्री शिंदे म्हणतात. दरम्यान, यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी सायंकाळी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला भेटायला यावे, हरकत नाही. पण ते येणार की नाही याबाबत माझ्याकडे ठोस माहिती नाही. ते आले तर त्यांचे मराठा समाजाच्या वतीने स्वागत करू, मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी आम्ही सरकारला 1 महिन्याची मुदत दिली आहे. ते येथे आल्यानंतर आम्ही पुन्हा त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करू, असंही जरांगे म्हणाले.

Maratha Reservation : ‘मराठा सहजासहजी पेटत नाही अन् पेटला तर विझत नाही’; पल्लवी जरांगे कडाडल्या… 

मुख्यमंत्र्यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबाबत जरांगेंना विचारले असता ते म्हणाले की, बोलून मोकळे व्हायचे की काही करायचं हे आम्ही पाहू. आमची इच्छा नसतानाही आम्ही तुम्हाला एका महिन्याचा वेळ दिला. अशी विधाने कोणी करू नयेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांमधील संभाषणाचा वादग्रस्त व्हिडिओ खरा असेल तर सरकारला हे खूप महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला.

३० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यास ही जागा सोडणार का? हे उपोषण मागे घेणार का? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारला असता त्यांनी स्पष्टपणे नाही असे उत्तर दिले.

व्हिडिओमध्ये काय आहे?
मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रश्नोत्तरे सुरू होण्याआधीच शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संभाषण केलं. या तिन्ही नेत्यांना माईक सुरू असल्याचे माहीत नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, आपल्याला काय? बोलायचं अन् ऩिघून जायचं? बोलून मोकळं व्हायचं.. यावर अजित पवारांनी होय… येस, असा प्रतिसाद दिला. हा संवाद सुरू असतानाच फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानात माईक सुरू आहे, असं सांगितलं.

दरम्यान, यावर आता सीएम शिंदे यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं. त्यांनी लिहिलं की, मराठा आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडिया’वर चुकीच्या पद्धतीने संपादित करून फिरवणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.

https://x.com/mieknathshinde/status/1701879243851063395?s=20

मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासूनच संवेदनशील असून कायद्याच्या कक्षेत राहून आरक्षण देण्याबाबात सरकार प्राधान्याने काम करत आहे. सरकारने एवढी चांगली भूमिका घेतली असताना काही विरोधक जाणीवपूर्वक व्हिडीओ क्लिप एडिट करून लोकांच्या मनात गैरसमज पसरवत आहेत, हे अत्यंत निंदनीय आहे.असं सीएम शिंदे म्हणाले.

Tags

follow us