Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange patil) राज्य सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत उपोषण स्थगित केले आहे. त्यानंतर आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील नियोजन काय आहे? याची माहिती दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. येत्या 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील सध्या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आगामी महाराष्ट्र दौऱ्याची माहिती दिली.
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा मेगा प्लॅन! पुन्हा सुरू करणार महाराष्ट्र दौरा
जरांगे पाटील म्हणाले, 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या काळात राज्याचा दौरा करणार आहोत. या दौऱ्यात गावागावात सभा घेणार आहे. एकूण सहा टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यांसह अनेक ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत. या सोबतच 1 डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषणही केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
15 नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा, 16 नोव्हेंबर दौंड, मायनी, 17 नोव्हेंबर सांगली, कोल्हापूर, कराड, इस्लामपूर, 18 नोव्हेंबर सातारा, वाई, रायगड, 19 नोव्हेंबर रायगड, पाचाड, महाड, मुळशी, आळंदी, 20 नोव्हेंबर तुळापूर, पुणे, खराडी, चंदननगर, खालापूर, कल्याणा, 21 नोव्हेंबर ठाणे, पालघर, त्र्यंबकेश्वर, 22 नोव्हेंबर विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर, 23 नोव्हेंबर नेवासा, शेवगाव, बोधेगाव असा दौरा राहणार आहे. दौऱ्याच्या पुढील टप्प्यात विदर्भ, उर्वरित मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यात जाणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा..
आमच्याकडे पुरावे आहेत त्यामुळे आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल अशीच गावागावांतील ओबीसींची भावना आहे. मराठ्यांना पुरावे मिळू नयेत ही फक्त नेत्यांची भावना आहे. आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. तसेच ज्यांनी आमच्या समाजाच्या हक्काच्या नोकऱ्या हडपल्या त्यांना काढून टाकलं पाहिजे. आमच्याकडे पुरावे आहेत की आम्ही आधीपासूनच कुणबी आहोत. आम्ही असं केलेलं नाही की आमच्याकडे पुरावा नाही आणि आम्ही ओबीसीत गेलोय. तसं काहीच केलेलं नाही. आमच्याकडे पुरावे आहेत म्हणूनच आम्हाला प्रमाणपत्र मिळू लागली आहेत. सामान्य ओबीसींना माहिती आहे की मराठा आणि ओबीसीत भांडण लावण्याचं काम ओबीसी नेते करत आहेत. हे हेच लोक म्हणत आहेत कारण त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे. 24 डिसेंबरपर्यंत जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आरक्षण विरोधी नेत्यांची नावं जाहीर करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.