Manoj Jarange Criticized Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. उपोषणाचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसून येत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सलाइन लावून उपचार घेण्याचं मान्य केलं. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) थेट शब्दांत आव्हान दिलं. फडणवीस यांना एकच म्हणणं आहे की,आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही ते सांगावं. आज संध्याकाळपर्यंतच काय ते सांगून टाकावं, अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जरांगे पुढे म्हणाले, आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी दोनच शब्दांत काय ते सांगून टाकलं पाहिजे. आम्ही आठ ते नऊ मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करणार किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे. फडणवीस साहेबांना आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करणार आहात की नाही? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.
सत्तेचा वापर कराडला सोडवण्यासाठी षडयंत्र सुरू; मनोज जरांगेंनी केला खळबळजनक खुलासा
आम्हाला पुन्हा उपोषणाला बसावं लागेल याची अपेक्षा नव्हती. परंतु, पुन्हा उपोषण करावं लागलं. आताही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दांत सांगावं. आमच्या एकाही बांधवांचा जीव जायला नको पण मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय अशी घणाघाती टीका जरांगे पाटील यांनी यावेळी केली. याबाबत आजच सांगून टाका तोंड लपवू नका संध्याकाळपर्यंत सांगून टाका. म्हणजे उपोषण सोडून देऊन दुसरा मार्ग स्वीकारता येईल.
तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिलं नाही तर तुम्हाला 5 वर्ष सुखाने खाऊ देणार नाही. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य करणार की नाही याचं उत्तर संध्याकाळपर्यंत सांगून टाका, अंमलबजावणी करायची की नाही सांगून टाका तोंड लपवू नका अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारले. आता मनोज जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकारकडून काही हालचाली होतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी रात्री उशिरा भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट दिली . यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेऊन सलाईन लावण्याचा आग्रह त्यांनी धरला. मनोज तरंगे यांच्या काही मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे धस यांनी जरांगे यांना सांगितलं. शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी मुदतवाढ तसेच आंदोलकांवरील गुन्हे आणि कुणबी नोंदणीच्या शोधासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर कक्ष स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांना सांगितलं.