जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा फुलस्टॉप! म्हणाले, ‘माझ्याकरता तो विषय संपलाय’

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Audio Clip: जरांगेंची भूमिका, अल निनोचा संभाव्य प्रभाव आणि मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर भुजबळांनी भाष्य केलं.

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Audio Clip

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप AI द्वारे बनवण्यात आली असल्याचं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी म्हटलं आहे. तसेच त्या ऑडिओ क्लिपची तपासणी व्हावी असी मागणी त्यांनी केली. या प्रकरणावरून सुरू असलेल्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला याबद्दल जास्त बोलायचे नाही. या पारावरच्या आणि चावडीवरच्या गोष्टी आहेत. याला एवढे महत्त्व का दिले जात आहे? माझ्याकरता तो विषय संपला आहे,” असं म्हणत भुजबळ यांनी या प्रकरणावर अधिक बोलणं टाळलं. यासोबतच त्यांनी भाजपमधील अंतर्गत स्पर्धा, मनोज जरांगे यांची भूमिका, अल निनोचा संभाव्य प्रभाव आणि मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरही भाष्य केलं.

500 कोटींच्या कथित प्रकरणात गुन्हा दाखल का नाही? SITच्या तपासावरून संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

भाजपमधील गळेकापू स्पर्धेवरही भाष्य

भाजपमधील अंतर्गत गळेकापू स्पर्धेमुळे ही टेप समोर आणण्यात आल्याचा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. याबाबत विचारलं असता भुजबळ म्हणाले, “अशा काही गोष्टी समोर आल्यानंतर विरोधी पक्ष त्याचा फायदा घेणार. विरोधी पक्ष त्यावर बोलणारच.”

मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर बोलणं टाळलं

ऑडिओ क्लिप आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या कथित डावाबाबत भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्यांनी या विषयावर अधिक चर्चा करण्यास नकार दिला.

“लोकशाहीमध्ये सर्वांना चळवळ करण्याचा आणि हक्क मागण्याचा अधिकार आहे. याबाबत मला काही चर्चा करायची नाही. मी त्यावर बोलावे, असे काही नाही. त्यांचे जे सहकारी आहेत, ते याबाबत बोलत असतात,” असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

अल निनोचा प्रभाव आणखी एक-दोन वर्षे राहण्याची शक्यता

अल निनोच्या संभाव्य प्रभावाबाबत बोलताना भुजबळ यांनी पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटाची शक्यता व्यक्त केली. अल निनोचा प्रभाव आणखी एक-दोन वर्षे राहू शकतो, असं त्यांनी सांगितलं.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवी माहिती; लाईव्ह बातम्या पाहून शुटर्स सावध

“अल निनो हा केवळ एका वर्षापुरता मर्यादित नसून आणखी एक-दोन वर्षे राहू शकतो. त्याचा प्रभाव अशा प्रकारे जाणवला, तर भविष्यात पाणी आणि दुष्काळाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आताही अनेक जण अडचणीत आले आहेत. शेतकरीदेखील अडचणीत आहेत. दुष्काळी परिस्थितीवर शासनाचे संपूर्ण लक्ष असून, त्यादृष्टीने काम सुरू आहे,” असं भुजबळ म्हणाले.

मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर भुजबळांची चिंता

मुंबईतील प्रदूषणाच्या वाढत्या समस्येवरही छगन भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली. आपलं संपूर्ण आयुष्य मुंबईत गेलं असून, गेल्या दोन-तीन वर्षांत प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाल्याचं त्यांनी सांगितलं.

“माझा जन्म नाशिकमध्ये झाला असला, तरी माझे संपूर्ण आयुष्य मुंबईत गेले. पूर्वी मुंबईमध्ये प्रदूषणाचा प्रश्न नव्हता. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रदूषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, याबद्दल मला अत्यंत वाईट वाटते” असं ते म्हणाले.

मुंबईतील प्रदूषणाच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित करत भुजबळ म्हणाले, “लाहोर प्रदूषणाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपण कुठे चाललो आहोत?”

ऑडिओ क्लिपनंतर जरांगेंनी घेतला मोठा निर्णय; मराठा समाजाला केले ‘हे’ आवाहन

विकास करताना पर्यावरणासोबतच मानवी जीवनाचाही विचार व्हायला हवा, असं त्यांनी स्पष्ट केलं. “विकास करताना मानवी चेहरा समोर ठेवून विकास करायला हवा. विकासाला मानवी चेहरा पाहिजे. तो जर लुप्त होत असेल, तर लोकांसाठी संकट निर्माण होईल,” असं म्हणत त्यांनी मुंबईतील प्रदूषणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं.

follow us