छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. जालना येथे आंदोलकांकडून तहसिलदार छाया पवार यांची गाडी फोडण्यात आली आहे. तर नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यातील बस सेवा बंद केली आहे. यामुळे चार जिल्ह्यांतील मिळून अंदाजे 2800 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Maratha reservation movement took a violent turn in Marathwada)
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मागील काही दिवसांपासून आंदोलन करत आहे. 17 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, या काळात आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याचवेळी सकल मराठा समाज बांधवही चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर राज्यातील अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आली आहे.
या गावबंदीचा मागील काही दिवसांत केंद्रीय मंत्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री हसन मुश्रीफ, भाजप खासदार प्रताप चिखलीकर पाटील चिखलीकर, आमदार एकनाथ खडसे, आमदार अशोक चव्हाण, माजी मंत्री रामदास कदम, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी मंत्री बदामराव पंडीत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अशा सर्वपक्षीय नेत्यांना फटका बसला आहे. त्यानंतर अहमदनगरमध्येही मंत्री दीप केसरकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन या तीन मंत्र्यांना विरोध करण्यात आला.
जालना येथील रामनगर येथे तहसिलदार छाया पवार यांची गाडी आंदोलकांनी फोडली. बाजीउम्रद येथील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ही गाडी फोडण्यात आली आहे. तहसीलदार पवार यांनी चर्चेसाठी गावात यावे अशी गावकऱ्यांची मागणी होती. त्यानंतर रामनगरमध्ये आंदोलकांनी रस्ता रोकोही केला आहे. यानंतर आंदोलनस्थळाजवळून निघालेल्या तहसीलदारांची गाडी अडवून दगडफेक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यातील बस सेवा बंद केली आहे. नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. बीडहून कल्याणकडे जाणाऱ्या बसवर चराटा फाट्याजवळ तर नांदेडमधील माहूर तालुक्यातील आष्टा फाटा इथे अज्ञात आंदोलकांनी दगडफेक केली. यात बसेसचे काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. यामुळे चार जिल्ह्यांतील 30 आगांमधील मिळून अंदाजे 2800 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.