मराठा आरक्षण आंदोलकांची नजर चुकवत CM शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर; पोलिसांनी पाळली कमालीची गुप्तता
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेत. कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव येथील कणेरी मठात विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी ते आले आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबद कमालीची गुप्तता पाळण्यात आली. कारण, मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) आंदोलनामुळे नेत्यांना गावबंदी केलेली आहे.
NED vs BAN: नेदरलँड्सचा विश्वचषकात दुसरा उलटफेर, बांग्लादेशचा 87 धावांनी पराभव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरातील कणेरी मठावर काडसिद्धेश्वर महाराजांची घेणार भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मठावर जाण्याचे कारण काय असावं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फेब्रुवारी महिन्यात मठात साजऱ्या झालेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यानंतर आता सीएम शिंदे दुसऱ्यांदा या ठिकाणी आले आहेत. कोल्हापूर पोलिसांनी शिंदेंच्या दौऱ्याविषयी गुप्तता पाळली. पोलिसांनी मीडियालाही शूटिंग करण्यापासूनही मज्जाव केला आहे.
अद्याप आरक्षण न मिळाल्यानं जरांगे पाटलांना आमरण उपोषण सुरू केलं. त्याला प्रतिसाद म्हणून राज्यभरात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली. कोल्हापुरातही राजकीय नेत्यांच्या प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील 14 गावांमध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात न येण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. त्यामुळं काल कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ यांना मराठा समाजाने दोन ठिकाणी अडवले होते.
अजित पवारांनाही गावबंदीचा फटका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही गावबंदीचा फटका बसला आहे. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा रोष पाहून त्यांनी बारामतीचा दौरा रद्द केला आहे. अजित पवार आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या बैठकीला जाणार होते. मात्र, मराठा समाजाची आक्रमकता आणि रोष पाहून त्यांच्यावर दौरा रद्द करण्यचाी नामुष्की आली होती. यावरून परिस्थिती किती टोकाला पोहोचली आहे, याचा अंदाज येऊ शकतो. तर कल्याणमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमाला मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले.
मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवारी
मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी होणार आहे. ही बैठक 30 ताऱखेला सकाळी 10 वाजता मंत्रालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली जाणार असल्याचं बोलल्या जातं.