धक्कादायक! सोलापुरमधील प्रसिद्ध मुलतानी बेकरीच्या मालकाची आत्महत्या, काय घडलं?
एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे ते मालक होते. ते सोलापूर शहरातल्या विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंट येथे गेले होते.
सोलापुरात एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीच्या मालकाने आयुष्य संपवलं आहे. (suicide) एका इमारतीवरून खाली उडी मारत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. सुनील सदारंगानी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून ते 60 वर्षांचे होते, असं समजतं. मात्र त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वीचा एका व्हिडीओ समोर आला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.
सदारंगानी यांच्या मृत्यूमुळे सोलापूरकर नागरिक चांगलेच हादरले आहेत. विजापूर नाका पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र त्यांच्या जाण्यामुळे शहरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
सुनील सदारंगानी हे 60 वर्षांचे होते. एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे ते मालक होते. गुरूवारी दुपारी सुनील सदारंगानी हे सोलापूर शहरातल्या विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंट येथे गेले होते. तेथील जिना, पायऱ्यांच्या सहाय्याने ते या बिल्डींगच्या डायरेक्ट 17 व्या मजल्यावर गेले. तेथील भिंतीच्या कठड्यावर उभं राहून ते काही प्रार्थना करू लागले. आजूबाजूच्या स्थानिकांना, नागरिकांन हे दृश्य दिसलं आणि ते हादरलेच. काही लोकांनी त्या पनाश अपार्टमेंटच्या सुरक्षारक्षकाला या घटनेची माहिती दिली.
ते ऐकून सुरक्षारक्षकांनी लगेच वर धाव घेतली आणि सुनील सदरंगानी यांच्याशी बोलून त्यांना बिल्डींगमध्ये खाली आणलं. मात्र थोड्या वेळाने सदरंगानी यांनी त्याला सांगितलं की चावी वर राहिली आहे. हाच बहाणा करून, ते पुन्हा वर गेले आणि 17 व्या मजल्यावरून खाली उडी मारून एका क्षणात त्यांनी त्यांचं आयुष्य संपवलं. उंचावरून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकाराची नोंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याप्रकरणी विजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. सदारंगानी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. मात्र त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, आत्महत्या का केली, त्यांना काही ताण, समस्या होती का या सर्व अनुषंगाने पोलीस संपूर्ण तपास करत आहेत. सदारंगानी यांच्या जाण्याने अख्खं शहर हळहळलं.
