Download App

हीच ती वेळ ! ‘सजा’कारांनाही शिक्षा द्या; दोघांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. त्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र शुभेच्छा देतानाच त्यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर निशाणाही साधला. मराठावाडा मुक्त झाला पण, तरी या प्रदेशाची प्रगती झालेली नाही. त्यामुळे मराठवाड्यावर (Marathwada Liberation Day) ही वेळ आणणाऱ्या सजाकारांना शिक्षा द्या, असे त्यांनी आपल्या एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहीली आहे. यात ते म्हणतात, की आज 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो तसं हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा. कारण, मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता.

पण हे करताना फक्त फोटो ऑप म्हणून कार्यक्रम साजरा करणं किंवा मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणं म्हणजे हा दिवस साजरा केला असं मानून चालणार नाही. पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक वर्ष सुरू आहे. आणि ह्या वेळेला मराठवाडा क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पुढल्या काही महिन्यात पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे. अशावेळेस एकांगी आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं याचा विचार करायचा नाही हे सुरू राहणार असेल तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे.

रझाकारांना धडा शिकवलात आता सजाकारांनाही शिक्षा द्या

तुम्ह जो लढा दिलात तो काही तुमच्या तोंडाला कुणीतरी पानं पुसावीत म्हणून नव्हता याचं स्मरण राहू दे आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे आणि त्यासाठी निर्धार करण्याचा आजचा दिवस आहे. मी मागच्या वेळेस म्हटलं होतं तसं तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणली त्या सजाकारांना शिक्षा द्या, अशा शब्दांत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवत मराठवाड्यातील जनतेला आवाहन केले.

जाधवांना हवाय पवारांचा आशीर्वाद; ठाकरेंच्या विजयाचं गणितही सांंगितलं

 

Tags

follow us