जाधवांना हवाय पवारांचा आशीर्वाद; ठाकरेंच्या विजयाचं गणितही सांंगितलं
Bhaskar Jadhav : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली असून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणुकीत विजय आपलाच असे नेतेमंडळी ठासून सांगत आहेत. त्यात आता ठाकरे गटातील आणखी एका आमदाराची भर पडली आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ मजबूत होत असताना चिपळूणसह जिल्ह्यातील पाचही जागा जिंकू, असा विश्वास आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी व्यक्त केला.
शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, सोशल मीडिया, वृत्तपत्रांतील बातम्यांकडे लक्ष देऊ नका. जनमानसात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठिंबा वाढत असल्याने महाविकास आघाडी आधिक मजबूत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांची साथ, याच बळावर आपण चिपळूण-संगमेश्वरची जागा जिंकू असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…
जिल्ह्यातील पाचही जागा उद्धव ठाकरे गटाच्या निवडून येतील, यात काहीच शंका नाही. संधी मिळाली तर आपण चिपळूमधून लढू असे संकेत आमदार जाधव यांनी दिले. आता रत्नागिरी जिल्हा ताब्यात घेण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी आधिक जोमाने काम करून खेडमध्ये संजय कदम यांना तर गुहागरचे माझ्यावर सोडून द्या. आमदार राजन साळवी, रत्नागिरीत जो उमेदवार ठरेल तो तसेच चिपळूणची जागाही आपणच जिंकू असे जाधव म्हणाले. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.