बीड : “ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल, ज्यांच्याकडून तुम्हाला आयुष्यात मदत झाली असेल, त्यांच्याबद्दल थोडी तरी माणुसकी दाखवा, असं म्हणतं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित (Amar Singh Pandit) यांना अत्यंत कडक शब्दात फटकारलं. ते बीडमध्ये राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत बोलत होते. “साहेबांचे वय झाले”, असं म्हणतं अमरसिंह पंडित यांनी सहकाऱ्यांना पक्ष सोडायला लावला, असा संदर्भ देत पवार यांनी पंडित यांचा समाचार घेतला. (NCP National President Sharad Pawar reprimanded former MLA Amar Singh Pandit in very strong words)
जिल्ह्यातील नेत्यायंना काय झालं माहित नाही. एका नेत्याने सांगितलं, एक कोणीतरी आमचा सहकारी पक्ष सोडून गेला. चौकशी केली काय झालं? कालपर्यंत सगळं ठीक होतं. त्यांना अमरसिंह पंडीत यांनी सांगितलं की, पवार साहेबांचं आता वय झालं. त्यामुळे आपल्याला भवितव्याचा विचार करुन दुसरा नेता निवडला पाहिजे. आता एवढचं सांगतो, माझं वय झालं म्हणता. पण तुम्ही माझं काय बघितलं? असा सवाल करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
सामुदायिक शक्ती उभी केल्यावर काय होतं हे या जिल्ह्यातील लोकांच्या पाठिंब्यावर आम्ही यापूर्वी एकदा दाखवून दिलं आहे. अनेकांचे पराभव इथल्या तरुण पिढीच्या मदतीने झाले होते. ठीक आहे, तुम्हाला सत्तेच्या बाजूला जायचं आहे, जा. पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल, ज्यांच्याकडून तुम्हाला आयुष्यात मदत झाली असेल, त्यांच्याबद्दल थोडी तरी माणुसकी दाखवा, असं म्हणतं पवार यांनी अमरसिंह पंडित यांना अत्यंत कडक शब्दात फटकारलं.
आता जिल्ह्यातील चार पैकी धनंजय मुंडे, प्रकाश सोळंखे आणि बाळासाहेब आजबे हे आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. यासोबतच माजी आमदार अमरसिंह पंडित आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण हेही अजित पवार यांच्यासोबतच गेले आहेत. दुसऱ्या बाजूला आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत कायम आहेत. तर माजी आमदार उषा दराडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हेही शरद पवार यांच्याच बाजूने उभारले आहेत.