बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या (17 ऑगस्ट) बीडमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतरची त्यांची ही दुसरी जाहीर सभा आहे. मात्र या सभेपूर्वीच जिल्ह्यातील वातावरण तापलं आहे. अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर अजितदादांचाही फोटो दिसून येत आहे. (NCP President Sharad Pawar will hold a public meeting in Beed on 17 august)
राष्ट्रवादीच्या नावासह पक्षाच्या चिन्हासह हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. यावर अजित पवार आणि शरद पवार यांचे फोटो असून, “साहेब, बीडमध्ये आपले हार्दिक स्वागत.” असं म्हटलं असून, “कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या, आपला माणूस कामचा माणूस, आम्ही बीडकर दादांसोबत” असंही यावर लिहिलं आहे. बीडमध्ये रस्त्यारस्त्यांवर मोठ्या प्रमाणात हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
दरम्यान, शरद पवार यांची बीडमधील सभा ही पक्षाला जिल्ह्यात ताकद देण्यासाठी आणि अजित पवारांसोबत न गेलेले एकमेव आमदार संदीप क्षीरसागर यांना आशीर्वाद देण्यासाठी असल्याचे बोलले जाते. मात्र त्यापूर्वीच “कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या” असा सूचक संदेश देत अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी संदीप क्षीरसागर यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
बीड जिल्हा हा सुरुवातीपासूनच शरद पवार यांच्यासोबत चालणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अगदी समाजवादी काँग्रेसच्या काळातही जिल्ह्यातील सातही आमदार विजयी झाले होते. पुढे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही जिल्हा पवारांसोबत होता. अनेक मातब्बर घराणी राष्ट्रवादीसोबत आली. यातून विमल मुंदडा, सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर अशी मंडळी आमदार झाले. आताही जिल्ह्यातील 6 पैकी 4 आमदार राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्यातील हक्काचा बालेकिल्ला म्हणून बीडकडे पाहिले जाते.
आता जिल्ह्यातील चार पैकी धनंजय मुंडे, प्रकाश सोळंखे आणि बाळासाहेब आजबे हे आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. तर माजी आमदार अमरसिंह पंडित आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण हेही अजित पवार यांच्याबाजूने गेले आहेत. दुसऱ्या बाजूला आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत कायम आहेत. तर माजी आमदार उषा दराडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हेही शरद पवार यांच्याच बाजूने उभारले आहेत.
अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी हार न मानता आपण जनतेच्या दरबारात जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं अन् शक्तिप्रदर्शन करत लढाऊ बाणा दाखवून दिला. त्यानंतर त्यांची नाशिकमध्ये पहिली सभा पार पडली. तर आता 17 ऑगस्टपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून यातील दुसरी सभा बीडमध्ये होणार आहे.