Download App

जीवघेणा हल्ला, टाकीवर चढून आंदोलन… पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं फोडलं ‘सरपंचाचं’ बिंग

तारीख 26 डिसेंबर 2024. बीडमधील (Beed) संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्येने संपूर्ण राज्य हळहळत होते. रागात होते. वाल्मिक कराडपासून सुदर्शन घुलेपर्यंत सर्व आरोपींना अटक करावी म्हणून मोर्चे निघत होते. सर्वपक्षीय राजकारणीही एकवटले होते. अशातच शेजारच्याच धाराशिवमधून आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी आली. तुळजापूरच्या जवळगा मेसाईचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हा हल्ला झाला होता. अवघ्या महिन्याभराच्या अंतरात दुसऱ्या सरपंचाचा जीव धोक्यात आल्याने राज्यात चिंतेचे वातावरण होते. पण अवघ्या महिन्याभरात हा हल्लाच बनावट असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. केवळ बंदुकीचा परवाना हा बनाव रचल्याचं समोर आलं आहे, नेमकं चतुर पोलिसांनी हे कसे शोधून काढले? पाहुया या… (Police investigation has revealed that Sarpanch Namdev Nikam had himself attacked.)

नामदेव निकम हे धाराशिव तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथील सरपंच. त्यांचा पुण्यात ट्रॅव्हल्सचाही व्यवसाय आहे. त्यामुळे बहुतांश वेळ ते पुण्यातच असतात. अशातच 26 तारखेच्या मध्यरात्री गावाकडे परत येत असताना त्यांच्या गाडीवर दोन्ही बाजूंनी मोटरसायकल वरून आलेल्या अज्ञात तरुणांनी हल्ला केला. आधी हॉर्न वाजवत गोंधळ घातला. त्यानंतर त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि पेट्रोलचे फुगे गाडीमध्ये टाकले. हल्‍ला झाल्‍यानंतर नामदेव निकम यांनी गाडीचा वेग वाढवला. चिडलेल्या गुंडांनी काचांवर अंडी फेकली, शिवाय त्यांची गाडीही पेटवण्याचा प्रयत्न केला.

मध्येच श्वास थांबतो अन् झोप… वाल्मिक कराडला असणारा स्लीप ऍप्निया नेमका काय?

हल्ल्यानंतर घाबरलेल्या निकम यांनी तुळजापूर पोलिसांकडे चार अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. घटनास्थळाची सूक्ष्म पाहणी करून पोलिसांनी पंचनामा केला. शिवाय, या प्रकरणात तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात आली. मात्र, हल्लेखोराचा मागमूस काही केल्या लागत नव्हता. हल्ला होऊन दोन दिवस उलटल्यानंतरही हल्लेखोर सापडत नसल्याने निकम यांनीही गावच्या टाकीवर चढून हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोले स्टाईल आंदोलनही केले. मस्साजोगचे प्रकरण तापले असल्याने आणि निकम यांच्यावरील हल्लाही पवनचक्कीच्या वादातूनच झाला असावा अशी परिसरात चर्चा होती. त्यामुळे दहशतीचे वातावरण होते. पोलिसांवरही दबाव वाढत होता.

बीडमध्ये पत्रकारांवर पाळत, कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यातील; जितेंद्र आव्हांडांचे धक्कादायक दावे

आता पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. सरपंच नामदेव निकम व घटनेवेळी सोबत असलेला त्यांचा मित्र प्रवीण इंगळे यांची स्वतंत्रपणे पुन्हा चौकशी केली. एकप्रकारे वेगवेगळे बसवून उलटतपासणीच घेतली. इथेच दोघेही फसले. त्यांनी सांगितलेला घटनाक्रम व घटनास्थळावरील परिस्थितीशी जुळत नव्हती. त्यामुळे त्यामुळे खोलात जाऊन तपासणी केली. त्यावेळी दोघांनीही आपणच हा बनाव केल्याचे कबूल केले. निकम हे मागच्या काही दिवसांपासून बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. पण या परवान्यासाठी लागणाऱ्या अटी-शर्तींमध्ये ते बसत नव्हते. मस्साजोगचे प्रकरण तापलेले असल्याने यात हा परवाना मिळणे सोपे होईल, असा कयास लावून निकम यांनी मित्र प्रवीण इंगळेसह हल्ल्याचा बनाव रचला. त्यांच्या वाहनाची निकम यांनी स्वतःच तोडफोड केल्याचेही चौकशीतून समोर आले.

थोडक्यात मस्साजोगच्या तापलेल्या वातावरणात आपलीही पोळी भाजून घेण्याचा निकम यांचा प्लॅन होता. पण चालाक पोलिसांनी हा सगळा बनाव उघड केला.

follow us