Download App

Parbhani Protest : कायदा अन् सुव्यवस्था राखा! प्रकाश आंबेडकरांची अनुयायांना विनंती

परभणी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.

Distortion of the Constitution : परभणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेची (Sanvidhan) विटंबना करण्यात आल्याचा प्रकार काल घडलायं. या घटनेच्या परभणीतील आंबेडकरी अनुयायांकडून संताप व्यक्त केला जात असून निषेध व्यक्त करण्यासाठी अनुयायी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून परभणी बंदची घोषणा देण्यात आली असून ठिक-ठिकाणी टायर जाळून निषेध केला जात आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अनुयायांना कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबतचं आवाहन केलंय. यासंदर्भातील ट्विट त्यांनी केलंय.

बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, दरम्यान आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तक फाडल्याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी करत टायर पेटवून परभणी नांदेड महामार्ग रोखून धरला. मराठवाड्यातील परभणीत संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर जमाव आक्रमक झाल्याचं दिसतंय. पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक झाली. काही गाड्यांची मोडतोड देखील आंदोलकांनी केलीयं.

शेकापला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; आस्‍वाद पाटील यांचा राजीनामा, भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी समाजाला कायदा पाळण्याचं आवाहन केलं असून ते ट्विटमध्ये म्हणाले, “परभणीत जातीयवादी मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची केलेली भारतीय राज्यघटनेची तोडफोड ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचितचे परभणीतील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी होते आणि त्यांच्या निषेधामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि एकाला अटक केली. मी सर्वांना विनंती करतो की कायदा व सुव्यवस्था राखावी. येत्या 24 तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील!!!” असा इशाराही आंबेडकरांनी सरकारला दिलायं.

दरम्यान, संविधानाच्या अवमानावरून महाराष्ट्रातील परभणीमध्ये अचानक हिंसाचार उसळला आहे. यानंतर अनेक भागात जाळपोळ करण्यात आली. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. बेशिस्त लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

विटंबनप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करा – गायकवाड
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्याची घटना अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करण्याची हिंमत होतेच कशी? असा संतप्त गायकवाड यांनी केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी करावी आणि या प्रकरणामागे कोणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केलीयं.

follow us