शेकापला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; आस्वाद पाटील यांचा राजीनामा, भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा
Shekap Aswad Patil Resigns : शेतकरी कामगार पक्षाला होम ग्राऊंडवर मोठा धक्का बसला आहे. अॅड. आस्वाद पाटील यांनी शेकापचे जिल्हा चिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्यांनी त्याग केला आहे. आस्वाद पाटील हे शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. रायगडच्या पाटील कुटुंबातील गृहकलह पुन्हा एकदा समोर आला आहे. आस्वाद पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलयक माहिती आहे.
Dhairyasheel Patil join BJP : शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजप प्रवेश !
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील या शेकापच्या उमेदवार असतानाही त्यांचे भाचे आस्वाद पाटील, बंधू माजी आमदार पंडित पाटील हे प्रचारापासून दूर राहिले. निवडणूकीपूर्वीच त्यांनी चित्रलेखा पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. या निवडणूकीत चित्रलेखा पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.
विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता शेकापमधील कुटुंब कलह समोर आला आहे. माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव अॅड. आस्वाद पाटील यांनी जिल्हा चिटणीस पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हॉटेल रविकिरण येथे आस्वाद पाटील यांच्या समर्थकांची बैठक पार पडली. या बैठकीत आस्वाद पाटील यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केलं. या बैठकीला पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपसथित होते.
लवकरच भाजप प्रवेश ?
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीपासून आस्वाद पाटील हे भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. विधानसभा निवडणूकीत ते अलिप्त राहिले. त्याचा मोठा फटका चित्रलेखा पाटील यांना बसला. आपण कुठल्या पक्षात जाणार यावर आस्वाद पाटील बोलायला तयार नाहीत. मात्र, भाजप नेत्यांशी झालेल्या अंतिम बोलणीनुसार ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितल.