Ranajagjitsinha Patil vs Tanaji Sawant : धाराशिव (Dharashiv) जिल्हा परिषद निवडणूक आरोप-प्रत्यारोपांनी प्रचंड गाजली. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) आणि शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant) यांच्यामध्ये टोकाचा राजकीय संघर्ष आहे. झेडपीच्या अध्यक्षपदावरून आता दोघांमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय. आपली पत्नी अर्चना पाटील (Archana Patil) यांना अध्यक्ष करण्यासाठी राणाजगतिसिंह पाटील यांनी संख्याबळ जमविले आहे. त्यांनी शिवसेनेचे काही सदस्य आणि अपक्ष सदस्य गळाला लावले आहेत. त्यांना सहलीला पाठविले आहे. पण शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांकडून राणाजगजितसिंह पाटील यांना दोन सदस्य पळविल्याचा आरोप करण्यात आलाय.
महायुतीकडे संख्याबळ पण नेत्यांमध्ये संघर्ष
55 सदस्य असलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तेसाठी 28 चे बहुमत हवे आहे. भाजपने सर्वाधिक 18 सदस्य निवडून आले आहेत. तर शिवसेनेचे 15 सदस्य निवडून आलेत. ठाकरे गट आठ, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा सदस्य आहेत. तर चार अपक्ष निवडून आले आहेत. महायुतीचे संख्याबळ 36 होत आहे. परंतु अध्यक्षपद कुणाला द्यायचा यावर संघर्ष सुरू झालाय. भाजपकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील, तर शिवसेनेकडून माजी खासदार रविंद्र गायकवाड यांच्या पत्नी उषाताई गायकवाड या शर्यतीत आहेत.
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
31 झेडपी सदस्य सहलीवर
आमदार राणाजगजिसिंह पाटील यांनी भाजप 18, शिवसेनेचे दोन सदस्य आणि काही अपक्ष सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा असे 31 सदस्य हे कोकणात सहलीला पाठविले आहेत. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पक्षातील आणि अपक्ष सदस्य हे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे. विशेष म्हणजे तानाजी सावंत यांचे पुतणे व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनीच काकांचे नेतृत्व सोडले आहे. त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्चना पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलाय.
अपक्ष सदस्य राणाजगजितसिंह पाटील यांच्याबरोबर
परंड्यासह उमरग्याच्या अपक्ष सदस्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास पसंती दिलीय. परंडा तालुक्यातील लोणी गटातून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार राणी रेवनाथ ढोरे यांनी आमदार तानाजी सावंतांची साथ सोडून राणाजगजितसिंह पाटलांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय.उमरगा तालुक्यातील तुरोरी गटाच्या अर्चना युवराज जाधव आणि आलुर गटाचे आप्पासाहेब मल्लिनाथ पाटील या अपक्ष सदस्यांनीही महायुतीला पाठिंबा दिला आहे.
तर शिवसेनेच्या काही सदस्यांना तानाजी सावंत यांची तक्रारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे बोलले जात आहेत. तर कळंबमधील शिवसेनेचे सदस्य अनंत लंगडे यांनीही तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केलाय. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात सावंतांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्यासोबत हातमिळवणी केली. एवढेच नव्हे तर, स्वतःच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात पडद्यामागून रसद पुरवून त्यांना अडचणीत आणण्याचे काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. सध्या घडीला संख्याबळ पाहता राणाजगजितसिंह पाटील यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांना जोरदार राजकीय धक्का दिलाय हे नक्की.
