भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; मुस्लीम नेते प्रा. तारिक मन्सूर यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची संधी
उत्तर प्रदेशातील मुस्लीम आणि ओबीसी समाजातील प्रमुख चेहरा असलेल्या प्रा. तारिक मन्सूर यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Muslim leader Prof. Tariq Mansoor : भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची निवड झाल्यानंतर आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी नवी टीम जाहीर करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि 8 राष्ट्रीय सरचिटणीसांची नियुक्ती करण्यात आली असून, पक्षाने संघटनात्मक आणि सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उत्तर प्रदेशातील मुस्लीम आणि ओबीसी समाजातील प्रमुख चेहरा असलेल्या प्रा. तारिक मन्सूर यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात उत्तर प्रदेशसह देशातील विविध राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
प्रा. तारिक मन्सूर सध्या उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू असून शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्य म्हणूनही काम पाहिले आहे. मुस्लीम समाजातील सुशिक्षित आणि प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे ते ओबीसी समाजातून येत असल्याने भाजपने या नियुक्तीद्वारे ओबीसी मुस्लीम समाजाशी संवाद अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांचा पत्ता कट; भाजपकडून नव्या टीमची घोषणा
तारिक मन्सूर यांच्यासोबतच उत्तर प्रदेशातील कुंवर बासित अली यांनाही पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील नेतृत्वाला पक्षात अधिक स्थान देण्याचा संदेश भाजपकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपच्या संघटनात्मक रचनेतील महत्त्वाचे पद असलेले राष्ट्रीय सचिव (संघटन) पद पुन्हा एकदा बी. एल. संतोष यांच्याकडेच कायम ठेवण्यात आले आहे. तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील राष्ट्रीय उपाध्यक्षांमध्ये वसुंधरा राजे, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन दोशी, भारती पवार, मनप्रीत सिंह बादल, लाल सिंह आर्य, प्रा. एम. नागराज, प्रा. तारिक मन्सूर आणि डॉ. मधुचंद्र कर यांचा समावेश आहे. तर राष्ट्रीय सरचिटणीस (महामंत्री) म्हणून विनोद तावडे, सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, स्मृती ईरानी, सतीश पूनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह विविध राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी लक्षात घेता भाजपने सामाजिक, प्रादेशिक आणि राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून केल्याचे दिसून येत आहे. विशेषतः मुस्लीम आणि ओबीसी समाजातील प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीने प्रा. तारिक मन्सूर यांची नियुक्ती हा या कार्यकारिणीतील सर्वाधिक चर्चेचा निर्णय ठरत आहे.