बीड : स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्याप्रमाणेच त्यांच्या नातवानेही निष्ठेच्या बाबतीत तडजोड केलेली नाही, याचा मला आनंद आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते बीड येथील राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी सभेची तयारी पाहुनही पवार यांनी आमदार क्षीरसागर यांच्या कष्टाचे कौतुक केले. तसंच त्यांना आपल्या शेजारी बसायला जागा केली. या सभेला जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागातून अनेक बडे नेते, आजी, माजी आमदार पवारांच्या या सभेसाठी उपस्थित होते. (Sandip Kshirsagar sharad pawar ncp beed rally Maharashtra politics)
बीडमध्ये निष्ठेच्या बाबतीत कधीच तडजोड केली जात नाही. त्यामुळे अशा निष्ठावान लोकांच्या मागे बीडची जनता उभी राहाते. मला एक जुनी आठवण झाली. महाराष्ट्राचं नेतृत्व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होतं, आम्ही त्यांच्या विचारांनी काम करत होतो. त्यावेळी काही लोकांनी खऱ्या नेतृत्वापेक्षा वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बीड जिल्ह्याचं नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होतं. त्यावेळी केशरकाकूंनी निष्ठेची बाजू स्वीकारली. कोणी काहीही भूमिका घेतली तरी मी श्रद्धेसंबंधाची तडजोड करणार नाही. काहीही किंमत मोजावी लागली तरी माघार घेणार नाही. तीच परिस्थिती आज संदीप क्षीरसागर यांच्यामुळे बघायला मिळली, याचा आनंद आहे.
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही संदीर क्षीरसागर यांचे कौतुक केले. ते म्हणाले, साहेबांची इमेज खराब करायला हे सुरू आहे. वादळ आले… संदीप आज जिल्ह्याचा नेता झाला.. डरेंगे नाही लढेंगे.. हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढा आहे. अरे संदीप आज तुझी आजी प्रेमाने वरून बघत असेल की या लढाईत हा माझा नातू मैदानात उतरला आहे. अरे खरच सांगतो संदीप तुझ्याकडे बघून मला ही अपेक्षा नव्हती. पण जेव्हा तु मला खात्रीने सांगायचं, साहेब येऊन बघा काय करतो ते.
आता आज भगवान बाबाचा पोरगा, वंजाऱ्याचा पोरगा तुला शब्द देतो की बीडमध्ये खांद्याला खांदा लावून मी, बबन गिते, शंकर बांगर आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. हा बीड जिल्हा आपण हलवून दाखवू हा शब्द आज आपण साहेबांना देऊया. असेही आव्हाड म्हणाले. या सर्व प्रसंगांनंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर संदीप क्षीरसागर यांच्याकडे जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व आले असल्याचे दिसून येत आहे.