नगर परिषदेचे स्वच्छता सभापती शेख निजाम (Municipal Council) यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि शिवतीर्थ परिसरात जाहीर माफी मागावी, या मागणीसाठी सोमवारी शिवप्रेमी रस्त्यावर उतरले. शेख निजाम यांनी एका मुलाखतीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले.
एका मुलाखतीत शेख निजाम यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचे समोर आल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर शेख निजाम यांनी स्वतः समाजमाध्यमांवरून खुलासा करत आपण शिवरायांचे पाईक असल्याचे सांगितले होते. आपल्या व्यावसायिक इमारतीचे नाव ‘छत्रपती’ असून प्रत्येक मराठा आंदोलनात, तसेच शिवजयंती आणि मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आपण गळ्यात भगवा गमचा घालून आघाडीवर असतो, असा दावा त्यांनी केला होता.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्यात 5,086 कोटींचं वाटप
मात्र, या खुलाशानंतरही शिवप्रेमी आक्रमक झाले. सोमवारी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी शेख निजाम यांच्या बॅनरची रस्त्यावर होळी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवतीर्थ येथून निघालेला मोर्चा नगरपालिकेवर पोहोचला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेख निजाम यांनी तीन दिवसांत राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवप्रेमींनी दिला.
या आंदोलनात वैभव चिरके, सनी वाघमारे, साध्वी गायत्री, सोमेश कदम, ऋषी गिराम, रवी शिंदे, किशन चव्हाण, विशाल कांबळे, बालाजी गुरखुदे, देवीसिंह शिंदे, कुंदन काळे, तुषार दोडके, संजय मते, ओंकार पवार, मयुर भालेकर, रोहित ठाकूर यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
