Download App

चिठ्ठीत ‘आदित्य’, CM शिंदेंनी केलं ‘कान्हा’; बछड्यांच्या नावातही राजकारणाचा खेळ

Maharashtra Politics : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री छत्रपती संभाजीनगरात आहेत. विविध विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू आहे. अशातच राजकारणाच्या प्रांतात नेते मंडळींच्या कुरघोड्या कशा सुरू असतात याचे आणखी एक उदाहरण येथे पाहण्यास मिळाले. या प्रसंगावर आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.

‘त्यांना’ नामांतराच्या निर्णयाचा अधिकार होता का? CM शिंदेंचा ठाकरेंना थेट सवाल

चिठ्ठीला मुनगंटीवारांचा विरोध, शिंदेंनी चिठ्ठीच बदलली

शहरातील प्राणी संग्रहालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बछड्यांचा नामकरण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी चिठ्ठी काढत बछड्यांचे नामकरण केले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या चिठ्ठीने चांगलीच पंचाईत झाली.

कारण, शिंदेंनी जी चिठ्ठी काढली त्यावर ‘आदित्य’ असे नाव होते. हे नाव पाहताच शेजारीच असलेल्या अजितदादांनाही हसू आवरले नाही. त्यांनीही मग नाव जाहीर करा असे म्हणत मुनगंटीवारांना खोचक टोला लगावला. नेमका प्रकार लक्षात येताच हे नाव मागे घ्या, असे म्हणत मुनगंटीवार यांनी दुसरी चिठ्ठी काढायला लावली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही दुसरी चिठ्ठी काढली. या चिठ्ठीत कान्हा नाव होतं मग काय त्या बछड्याला कान्हा नाव दिल्याचं जाहीरही करून टाकलं. यानिमित्ताने राज्याचे राजकारण नेमकं कुठं चाललं आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. वाघांच्या बछड्यांच्या नामकरणातही राजकारण आणल्याचे येथे पाहण्यास मिळाले.

दरम्यान, या प्रकारानवर मंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले. जंगलात राहणाऱ्या वाघांच्या बछड्यांना नाव दिलं जात नाही. असे नाव फक्त उद्यानात जन्मलेल्या वाघांना दिले जाते. पण कोणतेही नाव देताना वाद निर्माण होऊ नयेत हे देखील पाहिले पाहिजे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

हीच ती वेळ ! ‘सजा’कारांनाही शिक्षा द्या; दोघांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा हल्लाबोल

तिरस्कार करा, आदित्य अजून तळपेल – दानवे

या प्रकारानंतर मात्र विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, हे कोणताही आदित्य लपवू शकत नाहीत. तो पृथ्वीतलावरचा असे किंवा पृथ्वीतलावरचा नसेल. जमिनीवर एक आदित्य असल्याचं सर्वांनाच माहिती आहे. त्याचं नाव कुणाला असेल किंवा नसेल त्याचा फरक पडत नाही. आदित्यला तळपण्यापासून कुणी थांबवू शकत नाही. कुणी कितीही तिरस्कार केला तरी फरक पडत नाही. माझ्या शुभेच्छा आहे त्यांनी असाच तिरस्कार करावा आदित्य अजून तळपेल.

Tags

follow us