सोलापूर : “माझ्या मित्राची, शरद भाऊची हत्या झाली. तो हिंदुत्ववादी नेता होता. तुरुंगात जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवण्याचे काम शरदभाऊने केले होते. त्यामुळे शरदभाऊला परत पाठवा म्हणून देवीकडे प्रार्थना करा, असे आवाहन करत तेलंगणाचे भाजप (BJP) आमदार टी. राजा (T. Raja) यांनी जाहीर सभेत मुक्ताफळे उधळली आहेत. सोलापुरात आयोजित केलेल्या हिंदु जन आक्रोश मोर्चात ते बोलत होते. (Telangana BJP MLA T. Raja praised notorious gangster Sharad Mohol in a public meeting)
कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) शुक्रवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मोहोळ याच्यावर त्याच्याबरोबर असलेल्या साथीदार मुन्ना उर्फ साहिल पोळेकर व इतर दोघांनी गोळीबार केला होता. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडाल्याचे बोलले जात आहे. शरद मोहोळच्या या हत्येची सध्या राज्यभरात चर्चा असतानाच भाजप आमदार दरम्यान, एका कुख्यात गुंडाचे असे जाहीर कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“माझ्या मित्राची, शरदभाऊची हत्या केली. तो हिंदुत्ववादी, गोरक्षण करणारा नेता होता. तुरुंगात एका जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवण्याचे काम शरदभाऊने केले होते. आता देवीकडे प्रार्थना करा आणि शरदभाऊला पुन्हा पाठवा अशी मागणी करा. आमच्यातलेच अनेक लोक दुष्मन झाले आहेत. त्यांना कसे ओळखायचे? असा सवालही टी. राजा यांनी यावेळी केला.
मला पत्रकार नेहमी विचारत असतात, की भारत हा देश हिंदूराष्ट्र कधी होणार? मला सांगावसं वाटतं की, भारत हा देश हिंदू राष्ट्रच आहे. इथली प्रत्येक इंच जमीन ही फक्त हिदूंचीच आहे. बाकी कोणाचीही नाही. इथल्या जमीनीवर फक्त आणि फक्त हिंदूंचाच अधिकार आहे. ज्या देशात 90 टक्के हिंदू राहतात, त्या देशाला हिंदू ऱाष्ट्रच म्हणतात. आमच्या कुठल्याही हिंदूला जर कोणी वाकड्या नजरेनं पाहत असेल तर ती आम्ही ती नजर जाग्यावर ठेवणार नाही. ठेवायची नाही, असा इशारा यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला.