Download App

ठाकरेंना मोठा धक्का! शहरप्रमुखासह 35 पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र; भाजपात प्रवेश?

शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.

Uddhav Thackeray : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षांतरं केली. अनेकांचा हा प्रयोग यशस्वी ठरला मात्र असेही काही नेते होते ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर पक्षांतर केलेल्या या नेतेमंडळींत अस्वस्थता वाढू लागली आहे. या अस्वस्थतेतूनच त्यांनी पुन्हा घरवापसी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षांना गळती लागली आहे. याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत आहे. एकामागोमाग एक मोठे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडत आहेत.

आताची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आली आहे. शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करत नुकताच राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वामी यांनी राजीनामा दिल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

अजितदादांना लवकरच धक्का! सांगलीतील ‘हा’ मोठा नेता भाजपाच्या वाटेवर; घरवापसीचे संकेत

पदाधिकाऱ्यांसह भाजपात करणार प्रवेश

पक्षात आता मान सन्मान मिळत नाही असा आरोप करत शहरप्रमुख स्वामी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. स्वामी यांच्याबरोबर उपजिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक, युवासेनेचे पदाधिकारी अशा पदाधिकाऱ्यांनी आता भाजपात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष संघटना बांधण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. यासाठी पक्षाने हालचालीही सुरू केल्या आहेत. परंतु, दुसरीकडे गळती लागल्याने त्यांच्यासमोरील अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

स्वामी यांनी फेसबूकवर पोस्ट लिहीत या निर्णयाची माहिती दिली आहे. या सोबतच त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेले पत्रही जोडले आहे. या पत्रात त्यांनी शहरप्रमुख पद आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच त्यांनी राजीनामा देणाऱ्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची नावेही या पत्रात दिली आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला असल्याचे स्वामी यांनी या पत्रात नमूद केले आहे.

हात जोडतो, पाया पडतो.. उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका; खैरे थेट व्यासपीठावर नतमस्तक

खैरेंची विनवणीही गेली व्यर्थ

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरातील एकनाथ रंगमंदिरात आयोजित मेळाव्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी थेट व्यासपीठावर नतमस्तक होत शिवसैनिकांना विनंती केली होती. मी हात जोडून सर्वांना विनंती करतो. तुम्हाला इथं दंडवत घालतो, उद्धव ठाकरेंकडं आपल्याला पहायचं. परवाच्या कार्यक्रमा ते किती कळकळून बोलले होते. म्हणून आता मी तुम्हाला विनंती करतो, कुठेही सोडून जाऊ नका. एकत्र मिळून काम करू. माझं काही चुकलं तर बोललात तरी हरकत नाही. माझी विनंती आहे थांबा. आपल्याला उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम करायचं आहे. त्यांच्या नेतृत्वात आपण जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका नक्कीच जिंकू असे खैरे म्हणाले होते.

त्यांच्या या विनंतीनंतर पदाधिकारी पक्षातून जाणार नाहीत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागतील असे अपेक्षित होते. परंतु, खैेरे यांची विनवणीही व्यर्थ गेल्याचे या राजीनामा सत्रातून दिसून आले आहे. शहर आणि जिल्ह्यातील नेते पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याने ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.

follow us