Who Is Sudarshan Ghule Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी सुदर्शन घुले याची, ऊसतोड मुकादम ते खंडणीखोर अशी ओळख आहे. केज तालुक्यातील टाकळी येथील सुदर्शन घुले (Sudarshan Ghule). त्याला तालुक्याचा भाई व्हायचं होतं, तालुक्यात दहशत निर्माण करायची होती. त्याच्या डोक्यात पूर्वीपासूनच भाईगिरी, नेतेगिरीचे खूळ भरलेलं होतं. जेमतेम ७वी पर्यंत शिकलेला सुदर्शन घरात एकुलता एक आहे. वडिलांचं निधन झाल्यामुळं घरात आई अन् सुदर्शन असे दोघेच (Sarpanch Santosh Deshmukh Murder) राहायचे.
ऊसतोड मुकादम ते खंडणीखोर
हिंदी सिनेमातील डॉनसारखं…एखाद्या बड्या नेत्यासारखं मिरवायचं…थाटात राहायचं…यासाठी त्याची पावले फार पूर्वीपासूनचा एका गॉडफादरच्या शोधत होती. सुदर्शनकडे दोन-चार एकर कोरवाहू जमीन (Beed News) होती, पण त्याला शेतीच्या कामात सुरूवातीपासूनच आवड नव्हती. राजकीय नेत्यांसोबत फोटो काढायचे, कार्यकर्ता म्हणून तालुका अन् जिल्ह्याच्या ठिकाणी मिरवायचं..असंच त्याचं स्वप्न होतं. सुरूवातीला सुदर्शन उसतोड मुकादम म्हणून काम करत होता. मजूरांकडून काम करून घेणं, गैरहजर असलेल्या मजुरांकडून पैशाची वसुली करायची, हेच सुदर्शनचं काम.
सुदर्शन अन् विष्णू चाटेची ओळख कशी झाली?
यादरम्यानच सुदर्शनची ओळख वाल्मिक कराडचा खास असलेल्या विष्णू चाटेसोबत झाली. या ओळखीतून सुदर्शनला काही कामं देखील मिळाली. हळुहळू राजकीय नेते, पक्षाचं काम करणे, व्यवहार सांभाळणे या कामांत सुदर्शन तरबेज (Beed Crime) झाला. वरिष्ठ सांगतील ते कामं करण्याची सुदर्शनची तयारी होती. धमक्या देवून वसुली करणे, चोरी करणे असे आरोप सुदर्शनवर आहेत. पवनचक्की अन् इतर धंद्यामधून त्याने वरिष्ठांची मर्जी सांभाळायची अन् खंडणी मागायची अशी कामे सुरू केली.
मस्साजोग येथे पवनचक्की उभारण्याचं काम सुरू होते. तिथे खंडणीच्या वादातून सुदर्शन घुले पोहोचला, अन त्याचा सुरक्षा रक्षकाशी वाद झाला. त्यावेळी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांच्यात वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अपमानाच्या भावनेतीतून सुदर्शन घुले अन् त्यांच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून 9 डिसेंबर रोजी निर्घृण खून केला. घटनेला 25 दिवस उलटून गेले तरी मारेकऱ्यांना अटक झालेली नव्हती. आज सकाळी मात्र मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.