Maratha Reservation : गेल्या 13 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटीलांचे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी बंद, आंदोलन, उपोषणं केली जात आहे. विविध संघटना, संस्था आणि मराठा तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहेत. धाराशिवमध्ये आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांनी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची भेट घेतली.
अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, त्यामुळं मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा नेत्यांबद्दलही आंदोलकांच्या मनात राग असल्याचं दिसून येत येत आहे. भेटीसाठी आलेल्या सावंत यांना मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का? असा सवाल आंदोलकांनी केला आणि गोंधळ उडाला. यावर मी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी कधीही रस्त्यावर उतरण्यास तयार आहे, असे म्हणत सावंत यांनी तिथून काढता पाय घेतला. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे.
‘जिंकले तर इतिहास घडेल आणि जिंकून दिलं नाही तरी इतिहास घडेल’, शिवशक्ती यात्रेतून पंकजा मुंडेंची गर्जना
सावंत यांनी उपोषणकर्ते अक्षय नायकवाडी यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणावर ठोस निर्णय न झाल्यास राजीनामा देणार का? असा सवाल आंदोलकांनी थेट सावंत यांना केला. यावर आरक्षण मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहणार असल्याची ग्वाही सावंत यांनी दिली.
मात्र सावंत यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने आंदोलकांनी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यांनी माईक खेचून घेत राजीनाम्याची मागणी करणाऱ्या तरुणाला खडसावले. त्यामुळं आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलक अमोल जाधव याला ताब्यात घेतले.
दरम्यान, दोन दिवसापूर्वी सरकारने कुणबी म्हणून नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला. मात्र, जरांगे पाटील हे सरकसकट आरक्षण द्यावं, या मागणीवर ठाम आहे. त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळं आज मराठा आरक्षणाच्या मुद्दावर राज्य सरकारने सर्वपक्षीयब बैठक बोलावली आहे. त्यामुळं या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.