धाराशिवमध्ये शिवसेनेला उपाध्यक्षपद पण तानाजी सावंतांना राणाजगजितसिंह पाटील भारी पडले ?

Zilla Parishad Dharashiv-भाजपच्या अर्चना पाटील यांची अध्यक्षपदी निवड. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषा रविंद्र गायकवाड यांची वर्णी लागलीय.

Dharashiv Zp

Dharashiv Zp

Zilla Parishad Dharashiv: धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक खूप गाजली. सदस्य निवडल्यानंतर झेडपीचा अध्यक्ष भाजपचा होणार की शिवसेनेसाठी यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. भाजपचे आमदार व स्थानिक नेते राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) व शिंदेसेनेचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू होता. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत वेगळं राजकीय समीकरण उदयास येतं का ? अशी शक्यता होती. पण अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राजकीय ट्वीस्ट संपला. भाजपच्या अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषा रविंद्र गायकवाड यांची वर्णी लागलीय. धाराशिवमध्ये महायुती कशी एकत्र आली. शिंदेंची शिवसेना कशी फुटता फुटता राहिले हेच पाहुया…

धाराशिव जिल्हा परिषदेत एकूण 55 सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे सर्वाधिक 19, शिवसेनेचे 15, राष्ट्रवादीचे सहा, शिवसेना (उबाठा) सात, काँग्रेसचे तीन, सपाचा एक आणि अपक्ष चार सदस्य होते. भाजपचे सर्वाधिक सदस्य असल्याने राणाजगजितसिंह पाटील यांनी आपली पत्नी अर्चना पाटील यांना अध्यक्षपदी बसविण्यासाठी रणनिती आखली होती. दुसरीकडे शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी शिवसेनेचे सदस्य, उबाठा, काँग्रेस, सपा आणि अपक्ष असे गणित जुळतं का अशी चाचपणी सुरू केली. शिवसेनेला अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी पहिल्यापासून भाजपकडे सुरू केली. तानाजी सावंत यांनी थेट राणाजगजितसिंह पाटील यांना आव्हान दिले होते. काही जण घरात सत्ता ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यांचा टांगा पलटी घोडे फरार करणार असे तानाजी सावंत म्हणत होते.

तिकडे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजप, राष्ट्रवादी अपक्ष सदस्य व दोन शिंदे गटाचे सदस्य मिळून संख्याबळ जुळवले आणि दगाफटका होऊन नये म्हणून सदस्य थेट सहलीवर बाहेरच्या राज्यात पाठविले. तब्बल महिनाभर सदस्य बाहेर होते. राणाजगजितसिंह पाटील यांनी संख्याबळ जुळविले होते. तर शिवसेनेने अध्यक्षपदाचा दावा सोडला नव्हता. तिकडे सत्तेचा वाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धडकला होता. शिवसेनेचे नेते व पालकमंत्री प्रताप सरनाईक, उपनेते डॉ. तानाजीराव सावंत, पक्ष निरीक्षक आमदार राजन साळवी, माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले आदींनी शिवसेनेच्या सत्तेसाठी गळ घातली होती. भाजपविरुद्ध शिवसेना सामना रंगण्याची चिन्ह रंगवली होती.

निवडीच्या काही तास आधी महायुती एकत्र
राणाजगजितसिंह पाटील यांनी सहलीवर पाठविलेले सदस्य गुरुवारी धाराशिवमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महायुतीद्वारे निवडणुकीला सामोरे जाण्याचे सूचना दिल्या होत्या. गुरुवारी रात्री दहा ववाजता महायुतीचे मतभेद रुपांतर मनोमिलनात झाले. अध्यक्षपद भाजप, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे देण्याचा निर्णय महायुतीच्या वरिष्ठांनी जाहीर केला. त्यानुसार गुरुवारी भाजपच्या नेत्या अर्चना राणाजगजितसिंह पाटील, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उषाताई रविंद्र गायकवाड यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. विरोधी गटाकडून उबाठाच्या उमेदवार कांचनमाला संगवे यांनी अध्यक्ष, तर काँग्रेसचे महेश देशमुख यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. अर्चना पाटील यांना 45 मते मिळाली, तर उबाठाच्या सांगवे यांना अवघे नऊ मते मिळाली. तर गायकवाड यांना 45 मते मिळाली. तर काँग्रेसचे देशमुख यांना दहा मते मिळाली. अर्चना पाटील यांच्या रुपाने पहिल्यांदाच धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष झाला आहे.

राणाजगजितसिंह पाटील यांनी तानाजी सावंत यांना धक्का देण्याची सर्व तयारी केली होती. शिवसेनेचे काही सदस्य राणाजगजितसिंह पाटील यांच्याबरोबर होते. महायुती झाली नसती तर शिवसेनेचे काही सदस्य फुटले असते असे बोलले जात आहे. महायुतीमधील राणाजगजितसिंह पाटील आणि तानाजी सावंत हे एकमेंकाना कायमच पाण्यात पाहतात. झेडपीच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप व शिवसेनेचे दिलजमाई झाली आहे. पण किती दिवस राहिल हे मात्र सांगू शकत नाहीत. कारण दोघेही एकमेंकाविरुद्ध कुरघोड्या करतच राहलीत, असे स्थानिक पत्रकार सांगतात.

Exit mobile version