राहुरी पोटनिवडणूक, विधान परिषद आणि आता शिर्डी संस्थान; दरवेळी माझं नाव चर्चेत येतं आणि पत्ता कट होतो! सुजय विखेंचा मिश्किल टोला
प्रत्येक वेळी चर्चेच्या केंद्रस्थानी राहूनही संधी हुकत असल्याने आता स्वतः सुजय विखे यांनीच माध्यमांना एक मिश्किल पण सूचक सल्ला दिला आहे.
Sujay Vikhe’s playful dig : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अहमदनगरच्या राजकारणात माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव सातत्याने विविध निवडणुकांसाठी चर्चेत येत आहे. मात्र प्रत्येक वेळी चर्चेच्या केंद्रस्थानी राहूनही प्रत्यक्ष संधी मात्र हुकत असल्याने आता स्वतः सुजय विखे यांनीच माध्यमांना एक मिश्किल पण सूचक सल्ला दिला आहे.
नगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना डॉ. विखे म्हणाले, राहुरी पोटनिवडणूक आली तेव्हा माझं नाव पुढे आलं आणि नंतर पत्ता कट झाला. विधान परिषद निवडणूक आली तेव्हाही माझं नाव चर्चेत आलं, पण पुन्हा पत्ता कट झाला. आता पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी माझं नाव समोर आलं आणि पुन्हा पत्ता कट झाला. त्यामुळे यापुढे माझं नाव चर्चेत आणूच नका.
त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र या मिश्किल प्रतिक्रियेमागे राजकीय वास्तवाचेही सूचक भाष्य दडलेले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शिर्डीच्या साईबाबा संस्थानाच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीच्या हालचालींना वेग आला असून त्यातही सुजय विखे पाटील यांचे नाव चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
प्रणित मोरेच्या शोमध्ये 370 रुपयांच्या बिर्याणीच वक्तव्य करणं भोवलं, कंपनीने तरुणाला दाखवला बाहेरचा रस्ता
या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. विखे यांनी स्पष्ट केले की, शिर्डी संस्थानावर कोणाची नियुक्ती करायची हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यांनी सांगितले की, संस्थानच्या नियुक्ती प्रक्रियेत विखे पाटील कुटुंब यापूर्वी कधीच सहभागी नव्हते. तरीही शिर्डीकरांचा विखे कुटुंबावर असलेला विश्वास कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी शिर्डी संस्थानाच्या भविष्यासंदर्भातही महत्त्वाचे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, संस्थानच्या विश्वस्त मंडळावर सुशिक्षित, अनुभवी आणि समृद्ध व्यक्तींना संधी मिळायला हवी. मोठमोठ्या कंपन्या यशस्वीपणे चालविणारे उद्योगपती, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते सदस्य विश्वस्त मंडळात आले, तर त्यांच्या अनुभवाचा आणि दृष्टीकोनाचा शिर्डीच्या विकासासाठी मोठा फायदा होऊ शकतो.
तथापि, अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रितपणे घेतील, असे सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी या विषयावरील चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. एकीकडे शिर्डी संस्थानाच्या विश्वस्त मंडळाबाबतच्या हालचालींना वेग आला असताना, दुसरीकडे माझं नाव चर्चेत आणू नका, नाहीतर पुन्हा पत्ता कट होईल या सुजय विखेंच्या मिश्किल वक्तव्याचीच आता राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा रंगली आहे.