Next 4 days Heavy rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी लागली असून अनेक भागांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, कोकणासह नाशिक, पुणे या ठिकाणी काल रात्री वादळी वाऱ्यांसह पावसाने जोर धरला. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना आज व उद्यासाठी यलो (Heavy rain) अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सूनच्या अनुकूल स्थितीमुळे पाऊस वेळेआधीच सुरू झाला असून यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी (Meteorological Department) वर्तवला आहे.
मुंबई व उपनगरांमध्ये विजांचा कडकडाट, गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. ठाण्यात मुसळधार सरींसोबत वाऱ्यांचा जोरही जाणवला. पुण्यात पावसामुळे सखल भागात पाणी साचले, तसेच होर्डिंग कोसळून काही दुचाकींचे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली असून मौजे सोनगिरी गावात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सिंधुदुर्गात वादळी पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात बिगरमोसमी पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोठा फटका बसत आहे. मात्र हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता, पुढील काही दिवस जोरदार पावसाची तयारी ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.