Rain : तुफान पाऊस! पुढचे 24 तास धोक्याचे, 21 पेक्षा जास्त जिल्ह्यांना हाय अलर्ट
पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.

Maharashtra Rain Update Next 24 Hours : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले असून, नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनावरांचे मृत्यू, शेतजमिनींचे नुकसान आणि नागरिकांचे संसार उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.
दुहेरी संकटाची शक्यता
हवामान विभागाने 18 सप्टेंबर रोजी गुरुवारी देखील जोरदार पावसाचा इशारा दिला (Maharashtra Rain Update) आहे. या कालावधीत प्रति तास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार पावसाबरोबरच जोरदार (Rain Forecast) वाऱ्यांचे दुहेरी संकट राज्यासमोर उभे राहणार आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
कोकण अन् मुंबई परिसर
कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि पालघर येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूरमध्ये आधीच मुसळधार पावसामुळे हानी झाली असून, पुन्हा एकदा येथे पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे.
मराठवाडा व विदर्भात मुसळधार पाऊस
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागांतही तुफान पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सावधानतेचा इशारा
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. पूरस्थिती उद्भवल्यास मदत व बचावकार्य तत्काळ सुरू करता यावे, यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.