रश्मी शुक्ला यांना शुभेच्छा देताच मिलिंद नार्वेकर पुन्हा चर्चेत; ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये संभ्रम

माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे नार्वेकरांनी सोशल मीडियावर नवा राजकीय चर्चेचा विषय निर्माण केला आहे.

Untitled Design 61

Untitled Design 61

Milind Narvekar back in the spotlight : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे नार्वेकरांनी सोशल मीडियावर नवा राजकीय चर्चेचा विषय निर्माण केला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मिलिंद नार्वेकर यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचेच महाराष्ट्र लोकायुक्त म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिमानदं केले. महाराष्ट्र लोकायुक्त सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल माजी पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांचे मनपूर्वक अभिनंदन. त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबतच त्यांनी रश्मी शुक्ला यांचा फोटो देखील शेअर केला आहे.

विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त सदस्यपदी निवड झाल्यानंतर देखील नार्वेकरांनी त्यांचे अभिनंदन करणारी पोस्ट केली होती. त्यामुळे निवडीवेळी आणि आता शपथविधीनंतर पुन्हा शुभेच्छा दिल्याने अनेक नेटिझन्सनी नार्वेकरांनी प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे. काहींनी या पोस्टचे स्वागत केले असले, तरी अनेकांनी यामागे काही राजकीय संकेत आहेत का, अशी चर्चा सुरू केली आहे.

‘हा देश हिंदू राष्ट्र आहे, कोणाच्या अब्बाचे पाकिस्तान नाही’; मुंब्र्यातील सभेत नितेश राणेंचे वक्तव्य चर्चेत

रश्मी शुक्ला यांचे नाव महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये अनेकदा चर्चेत आले होते. त्यामुळे ठाकरे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याकडून त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेषतः सध्या शिवसेनेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होत असताना या पोस्टची अधिक चर्चा रंगली आहे.

मात्र, विरोधी पक्षात असतानाही सत्ताधारी पक्षातील किंवा वैचारिकदृष्ट्या विरोधी मानल्या जाणाऱ्या नेत्यांना शुभेच्छा देण्याची मिलिंद नार्वेकर यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध राजकीय नेत्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा नव्या जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मिलिंद नार्वेकर आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यातील वादही चर्चेत आला होता. शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात गाडीच्या हॉर्नवरून भास्कर जाधव यांनी नार्वेकर कोण लागून गेला? अशी टिप्पणी केली होती. त्यावर नार्वेकर यांनी सोशल मीडियावर प्रत्युत्तर देत, फ्रस्ट्रेशन! याचा फटका सामान्य शिवसैनिकांना बसत आहे, अशी टीका केली होती.

रश्मी शुक्ला यांना दिलेल्या शुभेच्छांच्या या नव्या पोस्टमुळे पुन्हा एकदा मिलिंद नार्वेकर चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, त्यांच्या या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Exit mobile version