‘हा देश हिंदू राष्ट्र आहे, कोणाच्या अब्बाचे पाकिस्तान नाही’; मुंब्र्यातील सभेत नितेश राणेंचे वक्तव्य चर्चेत

कावड यात्रेला संबोधित करताना नितेश राणे म्हणाले, “बोलता बोलता आपण मुंब्र्यात आलो असे म्हणतो, पण हे मुंब्रा नाही तर मुंब्रादेवी आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (74)

Nitesh Rane’s statement sparks discussion : ठाण्यातील मुंब्रा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कावड यात्रेदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वीच मुंब्र्याचे नामांतर ‘मुंब्रादेवी’ करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या नितेश राणे यांनी आता सार्वजनिक मंचावरून नागरिकांना ‘मुंब्रा’ऐवजी ‘मुंब्रादेवी’ असे संबोधण्याचे आवाहन केले आहे.

कावड यात्रेला संबोधित करताना नितेश राणे म्हणाले, “बोलता बोलता आपण मुंब्र्यात आलो असे म्हणतो, पण हे मुंब्रा नाही तर मुंब्रादेवी आहे. आजपासून कोणीही मुंब्रा म्हणू नका, मुंब्रादेवी म्हणा. हा परिसर कालही भगवा होता, आजही भगवा आहे आणि उद्याही भगवाच राहणार आहे. आपल्या मुंब्रादेवी परिसरात हिंदू समाजाची ताकद अधिक वाढली पाहिजे. यावेळी त्यांनी हिंदुत्व आणि राज्यातील सत्तेबाबतही भाष्य केले.

हा देश हिंदू राष्ट्र आहे, कोणाच्या अब्बाचे पाकिस्तान नाही. हे हिंदू महाराष्ट्र आहे आणि ही महादेवाची भूमी आहे. इथल्या हिंदू समाजाने कोणत्याही भीतीखाली राहू नये. देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने हा संदेश देण्यासाठी मी येथे आलो आहे, असेही राणे म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी स्थानिक हिंदू समाजाला विश्वास देण्याचा प्रयत्न केला. इथल्या हिंदूंना घाबरण्याची गरज नाही. हिंदुत्ववादी विचारांचे मुख्यमंत्री मंत्रालयात बसले आहेत. कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही.

नौदल कर्मचाऱ्यासह पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू, नेव्ही नगरमधील घटनेने मुंबई हादरली

जर कुणी घाबरवण्याचा प्रयत्न केला तर हा नितेश राणे एका तासात येथे पोहोचेल, असे विधान त्यांनी केले. तसेच मुंब्रादेवी परिसरातील भगवा विचार कायम राहील, असेही ते म्हणाले. दरम्यान, नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राणेंवर निशाणा साधताना, नितेश राणे ज्या विभागाचे मंत्री आहेत, त्या विभागातील प्रश्नांवर ते बोलत नाहीत.

कोकणातील रस्त्यांची अवस्था सुधारण्याऐवजी ते अशा विषयांवर वक्तव्य करत आहेत. टीव्हीवरून गायब झाल्यावर त्यांना बरं वाटत नाही. वरून आदेश आला की ते अशी वक्तव्ये करतात. जसे आपण कपडे बदलतो तसे त्यांनी भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकांवर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल उपस्थित केला.यापूर्वीही मुंब्र्यातील सभेत नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला होता. आता ‘मुंब्रा’ऐवजी ‘मुंब्रादेवी’ म्हणण्याच्या त्यांच्या नव्या आवाहनामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

follow us