सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात पडळकर उतरले; जयंत पाटलांविरोधातील घोषणाबाजीने वातावरण तापलं

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळं राजकीय वातावरण तापलं असून इथं आमदार पडळकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 30T153954.486

राज्यात जिल्हा बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी (Election) सुरु झाली असुन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनीही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी पुर्ण केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर काही काळ गदारोळाचं वातावरण निर्माण झालं. जयंत पाटील यांच्याविरोधात कार्यकर्त्यांकडुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यानं वातावरण तणावपुर्ण झालं होतं.

या निवडणुकीत जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय संघर्षाची चर्चा आधीपासुनच सुरु आहे. पडळकर यांच्या उमेदवारीमुळं या संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे अर्ज दाखल करताना झालेल्या घोषणाबाजीमुळं जिल्हा बँकेची निवडणुक केवळ सहकारापुरती मर्यादित न राहता राजकीयदृष्ट्याही महत्वाची ठरण्याचे संकेत मिळाले आहेत.

कोल्हापूरच्या ‘गोकुळ’साठी हाय व्होल्टेज लढत; सतेज पाटलांची सत्ता टिकणार की महायुती मारणार बाजी?

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीचा विचार करता सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुक बिनविरोध व्हावी, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेचा कारभार महत्वाचा असल्याचं सांगत त्यांनी ही भूमिका मांडली. मात्र दुसरीकडं निवडणुकीच्या रिंगणात प्रमुख नेत्यांकडुन उमेदवारी अर्ज दाखल होत असल्यानं चुरस वाढताना दिसत आहे.

गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा मांडला. ही शेतकऱ्यांची बँक असुन तिच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं, अशी आपली भावना असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचा पाठिंबा घेऊन आपण अर्ज दाखल करत असुन सदाभाऊ खोत यांच्यासह आणखी काही उमेदवारांचे अर्जही दाखल केले जात असल्याची माहिती पडळकर यांनी दिली.

या निवडणुकीत विशाल पाटील आणि त्यांच्या पत्नी पूजा पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी प्रथमच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकीकडं बिनविरोध निवडणुकीची मागणी होत असताना दुसरीकडं अनेक प्रमुख नेते मैदानात उतरल्यामुळं सांगली जिल्हा बँकेची निवडणुक चुरशीची होण्याची चिन्हं आहेत.

follow us