जून 2022 मधील विधान परिषदेची निवडणूक. एकूण 10 जागांसाठी निवडणूक झाली होती. पण यासाठी भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचे दोन असे एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 27 मतांचा कोटा निश्चित करण्याता आला होता. त्यावेळी शिवसेनेचे 55, राष्ट्रवादीचे 53 आणि काँग्रेसचे 44 आमदार होते. तर भाजपकडे अपक्षांसह 113 आमदारांचे पाठबळ होते. यानुसार शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीचे (NCP) दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकत होते. पण काँग्रेसला (Congress) दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 10 अतिरिक्त मतांची आवश्यकता होती. तर भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी 22 मतांची गरज होती.
काँग्रेसने पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत हांडोरे यांना मान्यता दिली होती. तर उर्वरित मतांच्या आधारे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार म्हणून भाई जगताप यांना तिकीट दिले. काँग्रेसकडे दुसऱ्या उमेदवारासाठी 17 मते होती. तर निवडून येण्यासाठी भाई जगताप यांना 10 मतांची बेगमी करण्याची सुचना देण्यात आली होती. प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा पहिल्या पसंतीचे हांडोरे पराभूत झाले. तर भाई जगताप निवडून आले. त्यामुळे जगताप यांनी मतांची बेगमी केली असावी. पण काँग्रेसचीच मते मोठ्या प्रमाणात फुटली. तब्बल 22 मते कमी पडत असतानाही भाजपचा पाचवा उमेदवार निवडून आला.
आता पुन्हा एकदा विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. यंदा ही निवडणूक 11 जागांसाठी होत आहे. या 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहेत. सध्या विधानसभेत 274 आमदार आहेत. त्यामुळे 23 इतका मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. दोन वर्षातील घडामोडींनंतर सध्याच्या संख्याबाळानुसार महाविकास आघाडीचे तीन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर मित्र पक्षांच्या मदतीने महायुतीच्या आठ जागा निवडून येऊ शकतात. इथं त्यांच्या नवव्या जागेसाठी पहिल्या पसंतीची पाच मत कमी पडतात.
या सगळ्या चित्रामुळे विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा घोडेबाजार होणार हे नक्की आहे. या घोडेबाजारात काँग्रेसच्या काही मतांवर महायुतीची नजर असल्याचे बोलले जाते. ही मते फुटल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मिलिंद नार्वेकर अडचणीत येऊ शकतात. ते कसे हेच आपण सविस्तर पाहू.
सध्या शरद पवार यांच्यासोबत 12 आमदार आहेत. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे 15 आमदार आहेत. मागच्या दोन वर्षातील दोन्ही पक्षांमधील फुटीच्या घटना आणि त्यात या आमदारांची भूमिका यामुळे ही मते कुठेही हालणार नाहीत असेच म्हणावे लागले. शिवाय शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे शंकरराव गडाख यांचे एक, कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांचे एक, शेकापचे श्यामसुंदर शिंदे यांचे एक, समाजवादी पक्षाची दोन अशी पाच मते तरी महाविकास आघाडीसाठी हक्काची मते आहेत. त्यामुळे कागदावर महाविकास आघाडीला आवश्यक असणारी 69 मते पूर्ण होतात.
पण काँग्रेस पक्षाबाबत सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड उलटसुलट चर्चा सुरु आहेत. यातही काही आमदारांबाबत विधिमंडळाच्या आवारात जाहीरपणे भाष्य केले जात आहे. यात इगतपुरीचे हिरामण खोसकर, अमरावतीच्या सुलभा खोडके आणि वांद्रे पूर्वचे झिशान सिद्दीकी या आमदारांबाबत अगदी उघडपणे नाव घेऊन बोलले जाते. खोसकर हे पूर्वीपासून अजितदादांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सुलभा खोडके यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये होत्या. 2019 मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी धर्म म्हणून काँग्रेसमध्ये आल्या आणि आमदार झाल्या. आजही त्यांचे पती संजय खोडके यांचा वावर जाहीरपणे अजितदादांसोबत आहे.
तर झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्याशिवाय भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे समर्थक तीन ते चार आमदार असून त्यांची मते महायुतीला मिळाली पाहिजेत, अशी तंबी त्यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसची ही मते फुटल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर संकटात येऊ शकतात.
प्रज्ञा सातव या थेट काँग्रेस हायकमांडच्या उमेदवार आहेत. मुस्लीम चेहरा अपेक्षित असताना आणि सातव यांच्याबद्दल नाराजी असतानाही त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे सातव यांना आवश्यक 23 मतांचा आणि अधिक खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त तीन अशा 26 मतांचा कोटा ठेवला जाण्याची शक्यता आहे. ही मते फुटणार नाहीत, याचीही काळजी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाला घ्यावी लागणार आहे. थोडासा हलगर्जीपणाही मोठ्या संकटाला निमंत्रण देऊ शकते.
दुसऱ्या बाजूला गडाख यांच्यासह नार्वेकर यांना 16 मते फिक्स आहेत. त्यांना अजून सात मते गरजेची आहेत. यासाठी काँग्रेसकडे शिल्लक असलेल्या 11 मतांची मदत घेतली जाणार आहे. ही मते मिळाली तर नार्वेकर आमदार झालेच म्हणून समजायचे. मात्र ही मते फुटली तर नार्वेकर यांची जागा संकटात येऊ शकते. त्यामुळे ठाकरेंकडून शिंदे गटातील नाराज आमदारांना संपर्क केला जाण्याची शक्यता आहे. या आमदारांचेही नार्वेकर यांचे चांगले संबंध आहेत.
आता प्रश्न राहतो तो जयंत पाटील यांचा. शरद पवार यांची 12 मते त्यांना मिळणार आहेत. त्यांना निवडून येण्यासाठी अजून 11 मते गरजेची आहेत. शेकापचे एकेकाळचे साम्राज्य आता ओहोटीला लागले असले तरी भाई जयंत पाटील हे आजही ‘रेलेव्हंट’ आहेत. ते सत्तादालनात प्रमुख नेते म्हणून वावरत असतात. पण त्यांची ताकद नसल्याने या 11 मतांसाठी त्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहे. ही मते ते कसे मिळवतात, त्यांना मैत्रीखातर ही मते मिळतील का? पवारसाहेब ही मते मिळवतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या तरी अनुत्तरीत आहे. त्यामुळे त्यांचा विजय कसा होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.