Nitesh Rane Letter To CM Fadnavis Celebrate Varaha Jayanti : मंत्री नितेश राणे यांनी (Nitesh Rane) बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी यावेळी वराह जयंती (Varaha Jayanti) साजरी करण्याचे आवाहन हिंदू समाजाला केले. तसेच, कोणत्याही प्रकारे विरोध झाल्यास हिंदू समाज शांत बसणार नाही, असा इशाराही दिला. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (CM Devendra Fadnavis) पत्र लिहून 25 ऑगस्ट रोजी भाद्रपद शुद्ध द्वितीयेला येणारी वराह जयंती राज्यभर अधिकृतरीत्या साजरी करण्याची मागणी केली आहे.
राणे यांनी पत्रात नमूद केले आहे की, हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव हा तिसरा अवतार आहे. तो वसुंधरेचा रक्षक व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणारा मानला जातो. वराह जयंतीचे धार्मिक, सांस्कृतिक तसेच पर्यावरण रक्षणाशी संबंधित महत्त्व अधोरेखित करून ही जयंती शासनाच्या पातळीवर व्यापक प्रमाणात साजरी केली जावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
वराह जयंती उत्सव दिन
पत्रात म्हटलंय की, 25 ऑगस्ट हा दिवस ‘वराह जयंती उत्सव दिन’ म्हणून घोषित करावा. जिल्हा पातळीवर अन् प्रमुख शहरांमध्ये सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वराह भगवानाच्या इतिहास व संदेशावर व्याख्याने आयोजित करावीत. राज्यभरातील मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा, भक्ती कार्यक्रम घ्यावेत, अशी मागणी नितेश राणे यांनी केलीय.
राणे यांनी स्पष्ट केलंय की, वराह भगवानाच्या पूजनाने समाजात धर्म, सदाचार आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत होते. त्यामुळे भविष्यातील पिढ्यांपर्यंत या परंपरेचा प्रसार व्हावा, यासाठी राज्य सरकारने सक्रिय भूमिका घ्यावी.
हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान असलेल्या भगवान वराह देव यांची जयंती येत्या २५ ऑगस्ट रोजी राज्यभर अधिकृत साजरी करण्याबाबत आज माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदनाद्वारे विनंती केली.@Dev_Fadnavis pic.twitter.com/xY36K0g1V2
— Nitesh Rane (@NiteshNRane) August 20, 2025
वराह जयंतीबाबत आवाहन
राणे म्हणाले की, वराहाला आपण विष्णूचा अवतार मानतो. 25 तारखेला वराह जयंती साजरी केली जाते. या जयंतीला मोठं महत्त्व आहे. भावी पिढीपर्यंत या परंपरेची माहिती पोहोचली पाहिजे. शालेय पाठ्यपुस्तकात यासंदर्भात धडा समाविष्ट करावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गावोगाव वराह जयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी. मी स्वतः नवी मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्यांनी विरोधकांना इशारा देत म्हटले, आम्ही कोणाच्या सणाला कधी वाकड्या नजरेने पाहत नाही. मात्र, जर कोणी वराह जयंतीला विरोध केला तर हिंदू समाज त्याला योग्य प्रत्युत्तर देईल.