MLA Mahesh Shinde’s allegations against the Guardian Minister : साताऱ्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले असून कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना महेश शिंदे यांनी पहिल्यांदाच आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. शंभूराज देसाई मला सुरूवातीपासूनच वेगळी वागणूक देतात. जिल्ह्यातील अधिकृत कार्यक्रमांना मला बोलावलं जात नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. यामुळे साताऱ्यातील शिवसेना संघटनेतील दरी आणखी स्पष्ट झाली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देखील आपणास कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाले नाही, असा दावा महेश शिंदे यांनी केला. फोन देखील आलेला नाही. हा शिवसेनेचा पहिलाच कार्यक्रम नाही की, मी अनुपस्थित राहतो. साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवरून गायब झाले आहेत, असे सांगत त्यांनी आपली नाराजी अधिक तीव्र शब्दांत मांडली.
राहुल गांधींना महिलांचा अपमान करण्याचा छंद; गोल्ड मेडलही त्यांनाच मिळेल, फडणवीसांनी वात पेटवली
फक्त एवढाच नाही, तर जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे? असा थेट सवाल करत त्यांनी स्थानिक नेतृत्वाला देखील टोला लगावला. या वक्तव्यामुळे पापक्षातील अंतर्गत गटबाजी उघडकीस आली असून स्थानिक पातळीवरील समन्वयाचा अभाव अधोरेखित झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना महेश शिंदे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. माझी पत्नी शिवसेनेतून निवडून आली, आणि भाजपकडून अध्यक्ष झाली नाही. आम्ही सुरूवातीपासूनच भाजपसोबत काम करत आलो आहोत, असे सांगत त्यांनी युतीतील आपली भूमिका अधोरेखित केली.
याचबरोबर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी म्हटलं की, पाच वर्षे पालकमंत्रीपद भूषवून देखील 30 सदस्यांपर्यंत पोहोचता आलं नाही, असा घणाघात करत त्यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक अपयशावर बोट ठेवले. महेश शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे साताऱ्याच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता या आरोपांना शंभूराज देसाई किंवा इतर स्थानिक नेते काय उत्तर देतात, तसेच पक्षश्रेष्ठी या प्रकरणात हस्तक्षेप करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
