Ratnakar Gutte on Dhananjay Munde : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. धनुभाऊ तुमची लायकी आहे का? तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता पण भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवले होते. तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील मला माहिती आहे. पण मी सगळेच आता काढणार नाही असं रत्नाकर गुट्टे गंगाखेड येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना म्हणाले.
गंगाखेडमध्ये (Gangakhed) बोलताना रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) म्हणाले की, तुम्हाला ज्यांनी सर्व पदं दिली त्यांनाही तुम्ही सोडले नाही. या सगळ्याची सुरुवात तुम्ही केली पण आता शेवट मी करणार. भय्यू महाराज आता हयात नाहीत. मात्र, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता भय्यू महाराजांनी (Bhayyu Maharaj) तुम्हाला वाचवले. तुमची लायकी आहे का? तरीही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी तुम्हाला सर्व पदं दिली. तुम्हाला तिथेही पंकजा ताई यांच्याविरोधात निवडणूक लढायची होती. तुम्ही सुरुवात केलीय मी याचा शेवट करणार. तुम्ही मला नीरव मोदी म्हणालात पण तुम्ही तर विजय मल्ल्या आहात कारण विजय मल्ल्याच्या आवडी आणि तुमच्या आवडीनिवडी एकच आहेत. तुम्ही गंगाखेडला आलात, मला तर परळीला यायला फक्त पंधरा मिनिटं लागतात. मी राजा आहे, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो. मी त्या पक्षांच्या स्टेजवर जाईन पण धनुभाऊ तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा गंगाखेडमध्ये बोलताना रत्नाकर गुट्टे यांनी माजी मंंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना दिला.
गंगाखेड नगर परिषदेमध्ये धनंजय मुंडे यांच्या मोठ्या भगिनी उर्मिला मधुसूदन केंद्रे या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे. त्यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी गंगाखेडमध्ये सभा घेत रासाप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर टीका करत रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता. तर आता रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर देत धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
