राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील (Kardile) त्यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला.
सात्वंनपर भावना व्यक्त करतांना सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले, दिन- दलित, शोषीत, गरीब , कष्टकऱ्यांच्या पाठिशी ते नेहमीच ठामपणे उभे राहिले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असे काम केले. सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी अपार , प्रेम व स्नेह होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व” होते. त्यांचा पिंड समाजकारण व राजकारणाचा होता. ते नेहमीच लोकांमध्ये वावरले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातून त्यांना सावरण्याचे बळ मिळो, ही प्रभू चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात जिल्हावासिय सहभागी आहेत.
Mla Shivajrao Kardile : भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
यावेळी त्यांच्या पार्थिवाचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे,आमदार अमोल खताळ,आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार सुरेश धस, आमदार शरद सोनवणे, आमदार राहुल कुल, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी जंगले महाराज, आदिनाथ महाराज व बाळासाहेब थोरात यांनी सांत्वनपर भावना व्यक्त केल्या. त्यांच्या अंत्यसंस्कारास राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले. जुलै २००२ ते जुलै २००४ या काळात ते मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे राज्यमंत्री होते, तर जुलै २००४ ते ऑक्टोबर २००४ या काळात त्यांनी जलसंधारण, वने, महिला व बालविकास, भूकंप, पुनर्वसन आणि मदतकार्य या विभागांचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. २००४ मध्ये ते अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
त्याचबरोबर, त्यांनी सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले असून २००७ पासून अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि २००८-०९ तसेच मार्च २०२३ पासून चेअरमन म्हणून त्यांनी कार्य केले. राज्य शासकीय समित्यांमध्ये त्यांनी रोहयो, पंचायतराज व सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीची सुरुवात ग्रामपंचायत बु-हाणनगरच्या सरपंचपदापासून झाली, जिथे ते १९८४ ते १९९६ या काळात कार्यरत होते.