Sandeep Deshpande On BJP : गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. महायुती (Mahayuti) सरकारवर विरोधक जोरदार टीका करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी करत आहे. तर आता या प्रकरणात मनसे (MNS) आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून एकत्रपणे मोर्चा काढण्यात येणार आहे. 5 जुलै रोजी होणाऱ्या या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील सहभागी होणार आहे. तर आता या प्रकरणात मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल करत भाजपमध्ये हिमंत असेल तर गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दाखवा असे आव्हान केले आहे.
माध्यमांशी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मनसे आणि शिवसेना उबाठाकडून मराठी भाषेसाठी आंदोलन सुरु केले आहे. मराठी माणूस दुधखुळा नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा भाषेच्या समृद्धीमुळे मिळाला आहे कारण मराठी भाषेतील साहित्य समृद्धी आहे. मराठी भाषेला इतिहास आहे त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. जर कोणाला वाटत असेल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन आपण उपकार केले आहे, तर माझे त्यांना आव्हान आहे, हिमंत असेल तर त्यांनी गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दाखवा, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. माध्यमांनी त्यांना भाजपच्या रणनीतीवर प्रश्न विचारला असता त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पशुपालकांसाठी बातमी! आता फक्त फोटोवरून कळेल वजन अन् किंमत; AI ॲप तयार
तर दुसरीकडे त्यांनी यावेळी 5 जुलै रोजी होणाऱ्या मराठी मोर्च्याबद्दल देखील माहिती दिली. यावेळी संदीप देशपांडे म्हणाले की, मराठी भाषेसाठी 5 जुलै रोजी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटचा मोर्चा निघणार आहे. यासाठी काल राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता आणि संजय राऊत यांचा कॉल आला होता. त्यामुळे आता एकत्रित मोर्चा निघणार आहे. आम्ही सर्व राजकीय पक्षांना आवाहन करतो की, या मोर्च्यात मराठी म्हणून सहभागी व्हा. त्यासाठी आम्ही सगळ्या राजकीय पक्षांसोबत बोलणार आहोत. असं यावेळी संदीप देशपांडे म्हणाले.