Download App

केंद्रात मंत्री मराठी अन् महाराष्ट्रातीलच रस्त्यांची दुरावस्था : मुलावरील टीकेनंतर ठाकरेंचं गडकरींवर तोंडसुख

पुणे : भाजपने टीका करण्यापेक्षा टोल मुक्त महाराष्ट्रची घोषणा दिली होती त्याचं काय झालं, ते सांगावं. महाराष्ट्रातील रस्ते व्यवस्थित नाहीत. खड्डे आहेत, फॅस्टटॅगची मनमानी सुरु आहे. पण त्यापूर्वीच टोल लावला आहे आणि आपण टोल भरतोय. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 17 वर्षांपासून सुरु आहे. सध्या मंत्री केंद्रातील मराठी आहे, महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्रातीलच रस्ते खराब आहेत. याच्या सारखं दुर्देव नाही, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपवर तोंडसुख घेतलं. (MNS Raj Thackeray criticized Shinde Government and Nitin Gadkari on roads in Maharashtra)

समृद्धी महामार्गावरील नाशिक येथील सिन्नरच्या टोल नाक्याच्या तोडफोड प्रकरणानंतर राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या टीकांवर प्रत्युत्तर देताना राज ठाकरे पुण्यात बोलत होते.

काय म्हणाले राज ठाकरे?

अमित महाराष्ट्र दौरा करत आहे आणि तो सगळीकडे टोल फोडत चाललाय असं नाही. त्याच्या गाडीवर फास्टटॅग होता, त्यानंतरही थांबवून ठेवलं होतं. त्यावेळी तो समोरचा माणूस उद्धट बोलला. त्यावर आलेली ती रिअॅक्शन होती. पण भाजपने टीका करण्यापेक्षा टोल मुक्त महाराष्ट्रची घोषणा दिली होती त्याचं काय झालं? ते सांगाव, असा प्रतिसवाल ठाकरे यांनी केला. तसंच प्रत्येकवेळी टोलचा ठेका म्हैसकर नावाच्या व्यक्तीला मिळतो. तो कसा मिळतो? कोण आहे हा म्हैसकर? कोणाचा लाडका आहे हा? टोलची प्रकरण काय आहे? असा सवालही त्यांनी विचारला.

ठाकरे पुढे म्हणाले, समृद्धी महामार्ग सुरक्षित आहे का? आजपर्यंत 400 जणांचा मृत्यू झाला आहे. ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस’ वे प्रमाणे समृद्धी महामार्गावर फेन्सिंग कधी लावणार? जनावर आडवी येतात, माणसं मरतात. रस्ते व्यवस्थित नाहीत. खड्डे आहेत, फॅस्टटॅगची मनमानी सुरु आहे. पण त्यापूर्वीच टोल लावला आहे आणि तो टोल आपण भरत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 17 वर्षांपासून सुरु आहे. सध्या मंत्री केंद्रातील मराठी आहे, महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्रातीलच रस्ते खराब आहेत, याच्यासारखं दुर्देव नाही, असं म्हणत ठाकरे यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली.

Tags

follow us