Maharashtra Monsoon Update : जून महिना संपत असून राज्यात आतापर्यंत मान्सून सक्रिय झाला नसल्याने अधीच अडचणीत असणारा शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. राज्यात मान्सून 15 जूनपर्यंत सक्रिय होणार होता मात्र गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची वाटचाल रखडलेली दिसत आहे. तर आता शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या बातमीनुसार, राज्यात पुढील आठवड्यात मान्सून सक्रिय होऊ शकते. 24 ते 25 जून दरम्यान राज्यात पुन्हा मान्सून गतिमान होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सून 8 जून रोजी दाखल झाला होता आणि 10 ते 15 जून दरम्यान पावसाची सुरुवात होणार होती मात्र मान्सूनची (Maharashtra Monsoon Update) वाटचाल रखडली. सध्या मान्सूनची उत्तर सीमा हर्णे, सोलापूर, हैदराबाद, रांची आणि मुझफ्फरपूर या भागांवरुन जात असून ती स्थिर आहे.
पुढील 4 ते 5 दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, छत्तीसगडच्या काही भागात आणि बिहारमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाल्याने राज्यात 24 ते 25 जूनपर्यंत मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
तूळ राशीसह ‘या’ राशींना होणार मोठा आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचा दिवसा कसा राहणार?
22 जूनपर्यंत तुरकळ पाऊस – हवामान विभाग
राज्यातील अनेक भागात 22 जूनपर्यंत तुरकळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान अतिवृष्टी होणार नाही. 24 जूनपासून कोकण पट्टी आणि राज्यातील इतर भागात पावसाचा जोर वाढणार आहे आणि तो 26 आणि 27 जूनच्या सुमारास उत्तर कोकणात दाखल होणार आहे असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
41 टक्के पावसाची तूट
तर दुसरीकडे मान्सून दक्षिण महाराष्ट्राच्या भागात अडकल्याने 4 ते 18 जून दरम्यान संपूर्ण देशात सरासरीच्या तुलनेत 41 टक्के पावसाची तूट निर्माण झाली असल्याची देखील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
