शरद पवारांनी संघटनेत भाकरी फिरवली; युवक, युवती आणि विद्यार्थी आघाडीत केल्या नव्या नियुक्त्या
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या बदलांना अंतिम स्वरूप देण्यात आले.
Major reshuffle in the party by Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून युवक, विद्यार्थी आणि युवती आघाड्यांमध्ये नव्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या बदलांना अंतिम स्वरूप देण्यात आले. या फेरबदलांमुळे पक्ष संघटनेत नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मानले जात आहे. पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. दरम्यान, युवक संघटनेच्या रचनेत महत्त्वाचा बदल करत पक्षाने युवक अध्यक्षपदाची विभागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता युवक संघटनेसाठी स्वतंत्रपणे शहरी आणि ग्रामीण अशी दोन पदे असणार आहेत. त्यानुसार विशाल शंकर वाकडकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) शहर प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाने यापूर्वी युवती संघटनेतही अशाच प्रकारचा बदल केला होता. युवती आघाडीच्या शहरी प्रदेशाध्यक्षपदी मनाली भिलारे तर ग्रामीण प्रदेशाध्यक्षपदी अमृता कालदाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाढत्या संघटनात्मक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र नेतृत्व निर्माण करण्याची रणनीती पक्षाने स्वीकारल्याचे दिसून येत आहे. या नियुक्तीप्रसंगी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, ग्रामीण कार्याध्यक्ष आशिष पवार, माजी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुशील बेर्डे, शिक्षक सेलचे राज्यप्रमुख राम राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, दुसरीकडे विद्यार्थी आंदोलनादरम्यान चर्चेत आलेली रिया अहीर हिने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. नीट परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनाच्या वेळी मुंबईत आंदोलनकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनसमोर निर्भयपणे उभे राहत रिया अहीर देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. तिच्या धाडसाचे अनेक स्तरांतून कौतुक झाले होते. मात्र, आंदोलनानंतर रियाला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे. तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तिचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ करून समाजमाध्यमांवर बदनामी करण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती देण्यात आली.
रिया अहीरची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारविरोधी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे एखाद्या तरुणीला अशा प्रकारे लक्ष्य करणे हे लोकशाहीविरोधी असल्याचे त्यांनी म्हटले. या कठीण काळात आपण आणि पक्ष तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी रियाला दिला. यावेळी शरद पवार यांनी राज्य सरकार आणि प्रशासनाला आवाहन करत रिया अहीरला धमक्या देणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच तिच्या सुरक्षिततेची हमी देऊन तिला संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.
एका बाजूला पक्ष संघटनेत नव्या नेतृत्वाला संधी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठे फेरबदल केले आहेत, तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थी आंदोलनातून चर्चेत आलेल्या रिया अहीरच्या समर्थनार्थ शरद पवार यांनी घेतलेली भूमिका देखील सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.