नियम धाब्यावर, बंदी असून देखील खासदार निशिकांत दुबे यांनी सपत्नीक घेतले भीमाशंकरचे दर्शन

बंदी असताना झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांना मंदिरात व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Untitled Design 23

Untitled Design 23

MP Nishikant Dubey visited Bhimashankar with his wife : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंदी असताना झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांना मंदिरात व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रशचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार दुबे हे आज (14 मार्च) दुपारी सुमारे दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने भीमाशंकर मंदिर येथे दाखल झाले. मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांदरम्यान सर्वसामान्य भाविकांना प्रवेश बंद असतानाही त्यांच्यासाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आणि त्यांना व्हीआयपी पद्धतीने दर्शन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

भीमाशंकर मंदिरातील सभामंडप आणि पायरी मार्गाचे बांधकाम सुरू असल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने 9 जानेवारी 2026 पासून मंदिर तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला स्थानिक नागरिक, भाविक आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दिला होता. त्यानंतर गेले अडीच महिने कोणत्याही भाविकाला मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता.

आखातातील युद्धसंकटामुळे तेथील भारतीय चिंतेत; भारतात नोकरी शोधणाऱ्यांची संख्या 30% ने वाढली

इतकेच नव्हे तर तपश्चर्या करत, हजारो किलोमीटर पायी वारी किंवा सायकलवारी करून आलेल्या अनेक भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागले. अगदी महाशिवरात्री सारख्या पवित्र दिवशीही मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने कायम ठेवला होता आणि तो सर्वसामान्य भाविकांनी समजूतदारपणे स्वीकारला होता. मात्र अशा परिस्थितीत एका व्हीआयपी नेत्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक भाविक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

“महादेवाच्या मंदिरात असा दुजाभाव का?” असा सवालही भाविकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, खासदार निशिकांत दुबे हे झारखंड राज्यातील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. या घटनेनंतर श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून व्हीआयपी दर्शनाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी “दर्शनासाठी कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही, याबाबत मला माहिती नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर आणि व्हीआयपी संस्कृतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाविकांमध्ये याबाबत तीव्र चर्चा सुरू असून संबंधित प्रकाराची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version