VIP दर्शन बंद, आता सर्व भाविकांसाठी एकच नियम; भीमाशंकर देवस्थानकडून मोठा निर्णय
Bhimashankar Temple VIP Darshan : भीमाशंकर देवस्थानाने सर्वसामान्य भाविकांना मोठा दिलासा देत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा
Bhimashankar Temple VIP Darshan : भीमाशंकर देवस्थानाने सर्वसामान्य भाविकांना मोठा दिलासा देत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीला स्वतंत्र्य दर्शन सुविधा दिली जाणार नाही. याच बरोबर सर्व भाविकांसाठी एकच नियम असणार असून ऑनलाईन बुकिंगशिवाय दर्शनाला प्रवेश मिळणार नसल्याची देखील माहिती भीमाशंकर देवस्थानाकडून देण्यात आली आहे.
भीमाशंकर देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा इतर कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीसाठी स्वतंत्र्य दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नाही. दर्शन व्यवस्थेत समानता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
भीमाशंकर देवस्थानाकडून (Bhimashankar Temple) देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या 24 तारखेपर्यंतचे सर्व ऑनलाईन बुकिंग स्लॉट भरले आहे. यामुळे भाविकांनी दर्शनासाठी किमान दोन दिवस अगोदर ऑनलाईन (Online) बुकिंग करुनच यावे असं आवाहन देवस्थान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारींच्या बैठकीत असं ठरलेलं आहे की, व्हीआयपी असं काही नाहीये. ज्यांना दर्शन करायचं असेल त्यांनी सर्वांनी बुकिंग केल्यानंतर यावं. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की, सर्व मंडळींनी, शासकीय असो किंवा कोणीही असो त्यांनी सर्वांनी बुकिंग करावं आणि बुकिंग लाईनने दर्शनाला यावं असं माध्यमांशी बोलताना भीमाशंकर देवस्थानचे मुख्य विश्वस्त मधुकर गवांदे म्हणाले.
दर्शनासाठी नियमावली जाणून घ्या
भीमाशंकर दर्शनासाठी नियमावली तयार करण्यात आली असून या नियमांनुसार, मंदिर व्यवस्थापन समितीचे अधिकृत वेबसाईटवर बुकिंग करावे. प्रति दिन हजार भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच नोंदणीकृत भाविकांची यादी माहितीसाठी वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 15 ते 30 जूनपर्यंत दररोज सकाळी 7 ते 11 पर्यंत दर्शन सुविधा उपलब्ध राहणार आहे. याच बरोबर ऑनलाई भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य राहणार आहे असं देखील भीमाशंकर देवस्थानाकडून सांगण्यात आले आहे.