MP Omraje Nimbalkar’s regret : महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या शिवसेनेतील संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याबाबतची आपली भूमिका प्रथमच स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सोडण्याच्या चर्चांदरम्यान त्यांनी विकासकामे, निधीची कमतरता आणि कार्यकर्त्यांचा वाढत दबाव याबाबत परखडपणे भाष्य केले आहे. दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीची ओमराजे निंबाळकर म्हणाले की, समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. पण निष्ठा असून देखील जर लोकांची कामे करता येत नसतील, तर मतदारांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी किती दिवस फिरणार? या शब्दांत त्यांनी आपल्या राजकीय द्विधा मनस्थितीचे वर्णन केले.
निंबाळकर यांनी सांगितले की, भावनिक दृष्टिकोनातून पाहिल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा वाटू शकतो, मात्र राजकीय वास्तवाचा विचार केल्यास तो योग्य वाटतो. सध्या ते पुण्यात असून 20 जून रोजी त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल लागणार आहे. त्यानंतर धाराशिवमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांबाबत बापळताना त्यांनी आपण मोठ्या धर्मसंकटात असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात दबाव येत असल्याची कबुली देत त्यांनी अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नसल्याचे म्हटले आहे.
पक्षांतरासाठी आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चांना त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले. पैसा आणि सत्ता माझ्यासाठी कधीच महत्वाची नव्हती. जर पैशासाठी राजकारण करायचे असते, तर मी यापूर्वीच पक्ष बदलला असता. माझा निर्णय हा मतदारसंघाच्या विकासासाठी आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आहे. असे ते यावेळी म्हणाले. महायुतीचं नेतृत्वाची कार्यपद्धती आणि उद्धवसेनेच्या नेतृत्वाची तुलना करताना निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्रियतेने कौतुक केले.
ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडाला नवे वळण; स्वतंत्र गटाची प्रक्रिया सुरू असतानाच 6 खासदारांनी टाळला शिंदेंचा मंच
स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये ते स्वतः मेहनत घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचवेळी प्रकृतीच्या कारणांमुळे उद्धव ठाकरे यांना दौरे करणे शक्य नसळायचे मान्य करत, आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय भूमिका घ्यायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. भविष्यतील राजकीय आव्हानांबाबत बोलताना निंबाळकर म्हणाले की, खासदार म्हणून लोकांची कामे करण्यासाठी प्रयत्न करून देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळत नाही. त्यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद कमी होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास स्वतःच्या राजकीय अस्तित्वावर देखील परिणाम होऊ शकतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मतदारसंघातील विकासकामांबाबत बोलताना त्यांनी गंभीर अडचणी अधोरेखित केल्या. शेतरस्ते, पूल, वीज वितरणासाठी रोहित्र (डीपी) बसवण्यासारख्या मूलभूत कामांसाठी वारंवार प्रस्ताव देऊन देखील कामे होत नसल्याचे त्यांनी सांगितले. आमच्याकडे ना पुरेसा निधी आहे, ना निर्णयक्षमता. लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत, पण त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक सत्ता आणि साधने आमच्याकडे नाहीत, असे ते म्हणाले.
दरम्यान, पक्षप्रवेशासाठी पैसे दिले गेल्याची किंवा त्यांना वाय-प्लस सुरक्षा पुरवण्यात आल्याची चर्चा देखील त्यांनी फेटाळून लावली. मी प्रत्येकाशी फोनवर बोलत आहे. मला कोणत्याही विशेष सुरक्षेची गरज नाही. पैशासाठी किंवा सुरक्षेसाठी मी हा निर्णय घेत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. ओमराजे निंबाळकर यांच्या या वक्तव्यांमुळे उद्धवसेनेतील अस्वस्थता आणखी स्पष्ट झाली असून, २० जूननंतर ते कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
