ठाकरे गट सोडणार की नाही? ओमराजेंच्या नव्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वाढला सस्पेन्स

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले.

Untitled Design (12)

Untitled Design (12)

MP Omraje’s statement heightens suspense : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील निकालानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातली संभाव्य फुटीर खासदार म्हणून त्यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. विशेषतः ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. मात्र, निकालानंतर ओमराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले.

माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, शिंदे गटात जाण्याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. माझ्य मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि त्यानंतर पुढील भूमिका ठरवेन. पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल आणि माझा राजकीय निर्णय यांचा काहीबाही संबंध नाही. सध्या कलियुग सुरू आहे.

यापूर्वी ओमराजे यांनी 20 जून रोजी येणाऱ्या निकालानंतर आपला राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे निकालानंतर ते शिंदे गटात प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा होती. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याचे देखील जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, ओमराजे यांच्या ताज्या वक्तव्यामुळे हा सगळं राजकीय अंदाज पुन्हा एकदा अनिश्चिततेकडे गेला आहे.

दरम्यान, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या प्रकरणातील निकाल ओमराजे यांच्या अपेक्षेप्रमाणे न लागल्याने त्यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तब्बल २० वर्षे त्यांनी या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी संघर्ष केला होता. त्यामुळे हा निकाल त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यतील महत्वाचा टप्पा मानला जात होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सीबीआयकडून उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याच्या शक्यतेवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

स्वाक्षरीशिवाय जबाब, पत्राचा रेकॉर्ड गायब, कबुलीजबाबात तफावत, पवनराजे हत्या प्रकरणात सीबीआयवर कोर्टाचे ताशेरे

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी देखील या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, पवनराजे हत्या प्रकरण हे ओमराजे निंबाळकर यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे भावनिक आणि न्यायालयीन युद्ध होते. या प्रकरणात त्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती आणि निकालाबाबत त्यांना मोठा विश्वास होता. मात्र, तो विश्वास तुटल्याने त्यांच्यावर मानसिक आणि भावनिक परिणाम झाला असावा.

अनिल देसाई म्हणाले, ओमराजे यांचा त्यांच्या वडिलांच्या हत्येनंतर सुरू झालेला 20 वर्षांचा संघर्ष आज देखील सर्वांना माहिती आहे. त्यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, पक्षाने बोलावलेल्या महत्वाच्या बैठकीला ते अनुपस्थित राहिले. त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केला आहे. त्यामुळे जर आता त्यांना पुन्हा आमच्यासोबत राहायचे असेल, तर त्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील.

ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ते ठाकरे गटातच राहणार की शिंदे गटाची वाट शरणार, याचा निर्णय आगामी काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या एका वक्तव्याने सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय पुन्हा एकदा गूढ बनला आहे.

Exit mobile version